PMJJBY: अलीकडच्या काळात जीवन खूप अनिश्चित झालं आहे. म्हणजे कधी कोणाचा मृत्यू होईल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्यानंतर कुटुंबाची फरफट होऊ नये यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. पण, प्रत्येकाची महागडा जीवन विमा खरेदी करण्याची ऐपत नसते. अशा लोकांसाठी केंद्र सरकारची एक योजना कामी येईल. केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच PMJJBY. ही योजना २०१५ मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत लोकांना जीवन विमा प्रदान केला जातो. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा प्रीमियम तुमच्या महिन्याचा मोबाईल रिचार्ज आहे.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काय आहे?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, लोकांना २ लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. जर आपण या योजनेच्या प्रीमियमबद्दल बोललो तर या योजनेचा प्रीमियम फक्त ४३६ रुपये वार्षिक आहे. या योजनेचा उद्देश देशातील गरीब लोकांना विमा प्रदान करणे आहे.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्रता काय?
१८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याच वेळी, विमा घेणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि ऑटो डेबिट संमती पत्र आवश्यक असेल, जेणेकरून तुमच्या खात्यातून प्रीमियम डेबिट करता येईल.
वाचा - LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
PMJJBY क्लेम कधी मिळतो?
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना PMJJBY योजनेचा दावा मिळतो. यात मृत्यू नैसर्गिक असो किंवा अपघातामुळे सर्व प्रकरणांमध्ये क्लेम मिळतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या कमी बजेटमुळे विमा घेत नसाल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.