Public Provident Fund : सरकारी योजनांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतून आता तुम्ही दरमहा १,०६,८२८ रुपये एवढे मोठे करमुक्त उत्पन्न मिळवू शकता! हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवू पाहणाऱ्यांसाठी ही एक अतिशय आकर्षक आणि सुरक्षित योजना आहे. भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केलेली ही दीर्घकालीन बचत योजना आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत कर सवलतीसह हमीयुक्त परतावा देते. यामध्ये ५०० रुपयांच्या किमान गुंतवणुकीसह कोणीही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकतो.
पीपीएफ काय आहे आणि त्याचे फायदे काय?
पीपीएफ ही निवृत्तीसाठी तयार केलेली योजना आहे, जी पगारदार तसेच व्यावसायिक लोकांसाठी उपयुक्त आहे. एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ८०C नुसार कर वजावट मिळते आणि मॅच्युरिटी रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. या योजनेचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे. १५ वर्षांनंतर ५-५ वर्षे असे करत तुम्ही योजनेचा कालावधी कितीही वेळा वाढवू शकता. तर खाते उघडल्यापासून ५ वर्षांनंतर आर्थिक वर्षात एकदा पैसे काढता येतात.
दरमहा १.०६ लाख रुपये कसे मिळतील?
दरमहा १,०६,८२८ रुपयांचे करमुक्त उत्पन्न मिळवण्यासाठी गुंतवणुकदाराला दीर्घकाळ आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल. प्रत्येक आर्थिक वर्षात संपूर्ण १.५० लाख रुपये गुंतवा. व्याजाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ही रक्कम १ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान 'एक रकमी' जमा करणे महत्त्वाचे आहे. ही मोठी रक्कम मिळवण्यासाठी ३२ वर्षांपर्यंत ही वार्षिक गुंतवणूक सुरू ठेवणे आवश्यक आहे.
| कालावधी | एकूण गुंतवणूक | मिळालेले व्याज (अंदाजित) | मॅच्युरिटी रक्कम (अंदाजित) |
| १५ वर्षे | २२.५० लाख रुपये | १८.१८ लाख रुपये | ४०,६८,२८८ रुपये |
| २० वर्षे | ३०.०० लाख | ३६.५८ लाख रुपये | ६६,५८,२८८ रुपये |
| २५ वर्षे | ३७.५० लाख रुपये | ६५.५८ लाख रुपये | १,०३,०८,०१५ रुपये |
| २९ वर्षे | ४३.५० लाख रुपये | ९९.२६ लाख रुपये | १,४२,७६,६२१ रुपये |
| ३२ वर्षे | ४८.०० लाख रुपये | १,३२,५५,५३४ रुपये | १,८०,५५,५३४ रुपये |
(टीप: हा परतावा सध्याच्या ७.१% व्याजदरावर आधारित आहे.)
निवृत्तीनंतरचा उत्पन्नाचा 'मेगा प्लॅन'
गुंतवणुकदाराने ३२ वर्षांनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे थांबवले, तेव्हा त्याला १ कोटी ८० लाख ५५ हजार ५३४ रुपये मिळतील. हा मॅच्युरिटी फंड सुरक्षित ठिकाणी (उदा. बँकेत, ७.१% वार्षिक व्याजदराने) जमा केल्यास, आपल्याला मिळणारा वार्षिक व्याज खालीलप्रमाणे असेल.
जमा रक्कम: १,८०,५५,५३४ रुपये
वार्षिक व्याज (७.१% दराने): सुमारे १५,०४,००० रुपये
दरमहा मिळणारे व्याज: १५,०४,०००/१२= १,०६,८२८ रुपये
पीपीएफ नियमांनुसार, खाते १५ वर्षांपुढे वाढवल्यास (विस्तारित केल्यास), मॅच्युरिटी फंडवर मिळणारे हे व्याज गुंतवणूकदाराला दरवर्षी एकदा काढता येते. या काढलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही, त्यामुळे १ लाखाहून अधिक उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त राहते. निवृत्तीनंतर एवढे मोठे आणि नियमित उत्पन्न मिळवण्याची ही योजना अनेकांसाठी एक उत्तम आर्थिक आधार ठरू शकते.
वाचा - ३ आठवड्यात सोन्यात ११,००० रुपयांची घसरण; चांदीचे दरही धडाम! भविष्यात आणखी कमी होणार?
टीप : या योजनेवर मिळणारा परतावा सरकार ठराविक महिन्यात जाहीर करत असते. त्यानुसार ही आकडेवारी कमी-जास्त होऊ शकते. अधिक माहितीसाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
