नवी दिल्ली: भारतात गेल्या अनेक दशकांपासून भारतीय पोस्ट ऑफिसचे (Post Office) प्रचंड मोठे जाळे आहे. एलआयसीप्रमाणे पोस्ट ऑफिसवर देशवासीयांचा मोठा विश्वास आहे. पोस्ट ऑफिसच्याही अनेक अशा योजना आहेत, ज्याचा उत्तम परतावा आपल्याला मिळू शकतो. पोस्ट ऑफिसने ग्रामीणवासीयांसाठी एक योजना आणली असून, यामध्ये दररोज केवळ ९५ रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवेळी १४ लाख रुपये मिळू शकतात, असे सांगितले जाते.
पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम ठरू शकतात. पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. ही योजना विशेष करून ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. या योजनेत विमाधारकाला जीवंत असताना मनी बॅकचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या पॉलिसी अंतर्गत बोनसही दिला जातो, अशी काही वैशिष्ट्ये या योजनेची सांगितली जातात.
भारतीय नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतो
ग्राम सुमंगल योजना मनी बॅक पॉलिसीचा लाभ आणि बोनस देते. हा विमा १५ आणि २० वर्षांसाठी घेतला जाऊ शकतो, पण यासाठी पॉलिसीधारकाचे वय १९ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. भारतातील नागरिक या धोरणाचा लाभ घेऊ शकतात, असे सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीने वयाच्या २५ व्या वर्षी ७ लाखांच्या गुंतवणुकीसह २० वर्षांसाठी ही पॉलिसी खरेदी केली, तर त्याला दररोज ९५ रुपये म्हणजेच हप्ता बसू शकतो. दरमहा २८५० रुपये द्यावे लागतील. तीन महिन्यांसाठी हप्ते भरल्यास, तुम्हाला ८,८५० रुपये आणि ६ महिन्यांसाठी तुम्हाला १७,१०० रुपये भरावे लागतील. यानंतर, तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजेच २० वर्षे पूर्ण झाल्यावर सुमारे १४ लाख रुपये मिळू शकतात.
दरम्यान, या योजने अंतर्गत १० लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. पॉलिसी दरम्यान व्यक्तीला जिवंतपणी १५ वर्षांमध्ये ६ वर्ष, ९ वर्ष आणि १२ वर्षांमध्ये २० टक्के पर्यंत पैसे परत दिले जातात. मॅच्युरिटीवर बोनससह उर्वरित रकमेपैकी ४० टक्के रक्कम देखील तुम्हाला परत दिली जाते.