Education Loan : आजकाल शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांवरही लाखो रुपये खर्च करावे लागतात. मोठ्या शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांना प्ले ग्रुपमध्ये टाकायलाही लाखभर रुपये फी सहज भरावी लागते. उच्च शिक्षणाचा विचार केल्यास ही रक्कम आणखी मोठी होते. इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि इतर पदवी अभ्यासक्रम तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत, देशातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शिक्षण कर्जची महत्त्वपूर्ण सुविधा पुरवते. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत, गरजू विद्यार्थी १० लाखांपर्यंत शिक्षण कर्ज मिळवून आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
PM विद्या लक्ष्मी योजना
या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना हमीदारशिवाय शिक्षण कर्ज दिले जाते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांना व्याजावर १००% अनुदान दिले जाते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या शिक्षण कर्जावर ३% व्याज अनुदान मिळते. या योजनेमुळे विद्यार्थी केवळ भारतातील नामांकित महाविद्यालयांमध्येच नव्हे, तर विदेशातील उच्च मानांकित संस्थांमध्येही आपले शिक्षण सुरू ठेवू शकतात.
कोणाला मिळू शकते १० लाखांचे कर्ज?
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत भारतातील कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो. यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रता: विद्यार्थ्याला १०वी आणि १२वीच्या परीक्षेत किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- प्रवेश: विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- आर्थिक स्थिती: कर्ज कालावधीत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती गंभीर नसावी.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
इच्छुक विद्यार्थी विद्या लक्ष्मी पोर्टल या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
- पोर्टलवर जाऊन एक अर्ज भरावा लागेल.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर शिक्षण कर्जासाठी अर्ज करता येतो.
- बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यावर विद्यार्थी आपले शिक्षण थेट सुरू करू शकतात.
वाचा - लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडथळ्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक मोठी मदत आहे.
