Petrol-Diesel Price : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधनाच्या दरांवरही दिसू लागला आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ५५ पाकिस्तानी रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक, उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इसहाक डार आणि वित्त मंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी शुक्रवारी मध्यरात्री ही घोषणा केली. सरकारने देशात पेट्रोलियमचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले आहे.
डिझेलचा दर ३३५.८६ रुपये प्रति लिटर
दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये हाय-स्पीड डिझेलची डिपोपूर्व किंमत पुढील आठवड्यासाठी ३३५.८६ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी हा दर २८०.८६ रुपये प्रति लिटर होता. म्हणजेच सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलची डिपोपूर्व किंमत २६६.१७ रुपयांवरून वाढवून ३२१.१७ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. ही जवळपास १७ टक्क्यांची वाढ असल्याचे सांगितले जात आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम
पाकिस्तानी ‘डॉन’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. हा संकटाचा काळ किती काळ टिकेल याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट वेळमर्यादा नाही. सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगत त्यांनी पेट्रोलियम पदार्थांची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
