lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेल स्वस्ताई नाहीच; फायदा होऊनही दर कमी करण्यास कंपन्यांची नकारघंटा

पेट्रोल-डिझेल स्वस्ताई नाहीच; फायदा होऊनही दर कमी करण्यास कंपन्यांची नकारघंटा

या कंपन्या दर कमी करण्यासाठी उत्सुक नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:58 AM2023-06-10T10:58:37+5:302023-06-10T10:59:35+5:30

या कंपन्या दर कमी करण्यासाठी उत्सुक नाहीत.

petrol diesel is not cheap companies refuse to reduce rates despite profit | पेट्रोल-डिझेल स्वस्ताई नाहीच; फायदा होऊनही दर कमी करण्यास कंपन्यांची नकारघंटा

पेट्रोल-डिझेल स्वस्ताई नाहीच; फायदा होऊनही दर कमी करण्यास कंपन्यांची नकारघंटा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ९ महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्के पेक्षा जास्त घसरण झाल्यानंतर, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची सर्वसामान्य जनता दीर्घकाळ वाट पाहत आहे. याचवेळी तेल वितरण कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ झाली   आहे. असे असताना या कंपन्या दर कमी करण्यासाठी उत्सुक नाहीत. तोटा भरून निघाल्यानंतरच दर कपातीचा विचार होईल, असे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तिन्ही कंपन्यांना गेल्यावर्षी दरांत बदल करण्यास सरकारने मनाई केली होती. त्यामुळे गेल्यावर्षी कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतरही पेट्रोल-डिझेलचे देशातील दर बदलले नव्हते. 

कंपन्यांना किती होतोय फायदा?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल उतरल्यानंतर गेल्या महिन्यांत पेट्रोलियम कंपन्यांचा नफा प्रतिलीटर ५० पैसे झाला आहे. मात्र गेल्यावर्षीचा तोटा भरून काढण्यासाठी तो पुरेसा नाही, असे सूत्रांनी सांगितले.

तेल कंपन्यांचा अडेलपणा

- कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा काही फायदा या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना द्यावा अशी आमची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

- मात्र, तेल विपणन कंपन्यांचे उच्च अधिकारी त्याच्याशी सहमत असल्याचे दिसत नाही. ते म्हणाले की कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास टाळाटाळ करत आहेत.

कच्चे तेल काेणत्या भावात?

$३.६ अब्ज म्हणजेच ३० हजार कोटी रुपयांची सरकारची बचत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदीमुळे झाली आहे.  (२०२२-२३ दरम्यान)

कोणत्या राज्यांत पेट्रोल १०० रुपयांच्या वर?

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्किम, ओडिशा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान येथे पेट्रोल १०० रुपयांवर आहे. ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत डिझेलचा दर १०० रुपयांपेक्षा अधिक आहे.

इंधन स्वस्त कधी होणार? 

पेट्रोलियम मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यात आले आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी? 

संपूर्ण देशात मध्य प्रदेश हे असे राज्य आहे, जिथे पेट्रोल-डिझेलची सर्वाधिक दराने विक्री होत आहे. यावर केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की,  पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करणार असून, यामुळे संपूर्ण देशात एकाच किमतीत पेट्रोल-डिझेल मिळेल. मात्र जीएसटी कधी लागू होईल हे त्यांनी सांगितले नाही.

- २२ मे २०२२ रोजी पेट्रोल-डिझेल सरकारने स्वस्त केले होते.
- १६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत सवलत देत रशियाने भारताला कच्चे तेल विकले. 
- ७४ डॉलर प्रति बॅरलऐवजी केवळ ५८ डॉलर प्रति बॅरल दराने भारताने रशियाकडून तेल खरेदी केली. यातून तेल कंपन्या मालामाल झाल्या.


 

Web Title: petrol diesel is not cheap companies refuse to reduce rates despite profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.