India Silver Reserve: चांदीच्या किमतींमधील तुफानी तेजीचं सत्र सातत्यानं सुरूच आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर २,८६,००० रुपये प्रति किलोच्या अतिशय जवळ पोहोचले आहेत. २०२५ मध्ये चांदीच्या किमतीत १६४ टक्क्यांची छप्परफाड वाढ पाहायला मिळाली होती. फक्त या वर्षात चांदीचे भाव सुमारे ४७,००० रुपयांनी (२० टक्के) वाढले. बुधवारी MCX वर चांदीच्या किमती जवळपास ५ टक्क्यांच्या वाढीसह २,९०,००० रुपये प्रति किलोच्या पार गेल्या. भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित मालमत्ता म्हणून वाढत्या मागणीमुळे चांदीच्या किमतीत ही मोठी वाढ दिसून येत आहे. याच दरम्यान, कोणत्या देशाकडे सर्वाधिक चांदी उपलब्ध आहे, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
'या' देशाकडे आहे ११,००,००,००० किलो चांदी
देशातील नामवंत गोल्ड आणि सिल्वर रिफायनरी 'MMTC-PAMP' च्या रिपोर्टनुसार, दक्षिण अमेरिकन देश पेरू (Peru) कडे जगातील सर्वात मोठा चांदीचा साठा (Silver Reserve) आहे. १२ नोव्हेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, पेरू कडे १,१०,००० मेट्रिक टन (११,००,००,००० किलो) चांदीचा साठा आहे. १ मेट्रिक टन म्हणजे १००० किलो. जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या साठ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे ९४,००० मेट्रिक टन चांदी आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर रशिया आहे, ज्यांच्याकडे ९२,००० मेट्रिक टन चांदीचा साठा आहे. चीन या यादीत चौथ्या स्थानावर (७२,००० मेट्रिक टन) असून ६३,००० मेट्रिक टन चांदीसह पोलंड पाचव्या स्थानावर आहे.
यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?
जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या साठ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर मेक्सिको (३७,००० मेट्रिक टन) आहे. २६,००० मेट्रिक टन चांदीसह चिली सातव्या स्थानावर आहे. या यादीत आठव्या स्थानावर अर्जेंटिना (२३,००० मेट्रिक टन) आहे. अमेरिका या यादीत नवव्या स्थानावर असून त्यांच्याकडे २३,००० मेट्रिक टन चांदी आहे. २२,००० मेट्रिक टन चांदीसह बोलिव्हिया दहाव्या स्थानावर आहे. सर्वाधिक चांदीचा साठा असलेल्या देशांच्या यादीत भारत ११ व्या स्थानावर येतो, भारताकडे ८,००० मेट्रिक टन (८०,००,००० किलो) चांदी आहे. विशेष म्हणजे, 'सिल्वर रिझर्व्ह'चा अर्थ त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे उपलब्ध असलेला चांदीचा साठा असा होतो.
