Personal Loan : सध्याच्या धावपळीच्या युगात कोणावर कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. म्हणजे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच एखादं मोठं आर्थिक संकट येतं आणि पूर्ण घडी विस्कटून जाते. अशा वेळी 'पर्सनल लोन' (वैयक्तिक कर्ज) हा एक अत्यंत सोयीस्कर आणि प्रभावी पर्याय ठरतो. पण, कर्ज घेण्यापूर्वी त्याचे गणित समजून घेणे भविष्यातील आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण, आजकाल मोबाईल फोन घेण्यापासून परदेशी सहलीपर्यंत पर्सनल लोन घेतले जात आहे.
१. पर्सनल लोन म्हणजे नक्की काय?
पर्सनल लोन हे एक 'अनसिक्युअर्ड लोन' (असुरक्षित कर्ज) आहे. म्हणजेच, हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचे घर, सोने किंवा कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नसते. म्हणूनच नोकरदार लोक आणि पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांमध्ये हे कर्ज सर्वाधिक लोकप्रिय आहे. फायनान्स संस्था आता डिजिटल प्रक्रियेद्वारे त्वरित मंजुरी आणि लवचिक परतफेडीचे पर्याय देतात.
२. पर्सनल लोनचे मुख्य फायदे
- तारणाची अट नाही : मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळत असल्याने जोखीम कमी असते.
- झटपट रक्कम: जर तुमची कागदपत्रे आणि पात्रता योग्य असेल, तर २४ तासांच्या आत रक्कम खात्यात जमा होऊ शकते.
- वापराचे स्वातंत्र्य : गृहकर्ज फक्त घरासाठी आणि कार लोन फक्त कारसाठी वापरता येते, पण पर्सनल लोन तुम्ही लग्न, शिक्षण, उपचार किंवा जुने कर्ज फेडण्यासाठी कुठेही वापरू शकता.
- परतफेडीची लवचिकता : १२ ते ९६ महिन्यांपर्यंतच्या कालावधीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार हप्ते ठरवू शकता.
३. पात्रतेचे निकष
- तुमचे उत्पन्न, वय आणि सिबिल स्कोअर यावर कर्ज मिळणे अवलंबून असते. साधारणपणे खालील अटी महत्त्वाच्या असतात.
- राष्ट्रीयत्व : भारतीय नागरिक.
- वय : २१ ते ८० वर्षे.
- नोकरी : सरकारी, खाजगी किंवा नामांकित कंपनीत कार्यरत.
- सिबिल स्कोअर : ६५० किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास कर्ज मिळणे सोपे जाते.
४. व्याजदर आणि छुपे खर्च
- पर्सनल लोनचा व्याजदर हा तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर ठरतो. ज्यांचा सिबिल स्कोअर चांगला आहे, त्यांना कमी दरात कर्ज मिळते. मात्र, केवळ व्याजदर पाहू नका; कर्जाची एकूण किंमत काढताना खालील बाबी तपासा.
- प्रोसेसिंग फी : कर्ज मंजूर करताना बँका काही शुल्क आकारतात.
- प्री-पेमेंट चार्जेस : मुदतीपूर्वी कर्ज फेडल्यास काही बँका दंड आकारतात.
वाचा - अदानी समूहाचा दणका! बांगलादेशाला वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी; ऐन निवडणुकीत विजसंकट
निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला 'हे' प्रश्न विचारा
- मला खरोखरच आता कर्जाची नितांत गरज आहे का?
- मी दरमहा हप्ता वेळेवर आणि सहजपणे भरू शकेन का?
- मला उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी सर्वात कमी व्याजदर मिळत आहे का?
