Personal Loan Agreement: बँकांकडून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची कर्ज दिली जातात. यात होम लोन आणि कार लोन यांसारख्या कर्जांचा समावेश आहे. लोकांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून पर्सनल लोन दिलं जातं. पर्सनल लोन हे एक अनसिक्योर्ड लोन असतं. यामुळे या कर्जाचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत खूप जास्त असतात. जर तुम्ही देखील तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेतून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
तुमचे पर्सनल लोन बँकेकडून मंजूर झालं असल्यास आणि तुम्ही लोनच्या अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करणार असाल, तर तुम्हाला संपूर्ण करार काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. त्यासोबतच काही मुख्य बाबींवर करारात जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
प्रीपेमेंट शुल्क
प्रीपेमेंट शुल्क (Prepayment Charges) जर तुम्ही तुमचे कर्ज निश्चित वेळेपूर्वी फेडलं, म्हणजेच तुम्ही कर्जाचे प्रीपेमेंट केलं, तर अनेक बँका यासाठी शुल्क आकारतात. अशावेळी, करारामध्ये प्रीपेमेंट शुल्क किती आहे, याची माहिती घ्या. साधारणपणे, प्रीपेमेंट शुल्क शिल्लक असलेल्या कर्जाच्या रकमेच्या २ ते ५ टक्के असतं. त्यामुळे स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रीपेमेंट शुल्क नक्की जाणून घ्या.
लेट पेमेंट शुल्क
लेट पेमेंट शुल्क (Late Payment Charges) लोन करारामध्ये लेट पेमेंट चार्जेसबद्दल (Late Payment Charge) देखील काळजीपूर्वक वाचा. जर तुम्ही ईएमआय भरण्यास उशीर केला, तर बँकांकडून हे शुल्क आकारलं जातं. त्यामुळे हे शुल्क किती आहे, हे आधीच जाणून घ्या.
हिडन चार्जेस
हिडन चार्जेसबद्दलही माहिती घ्या. कर्ज घेताना बँकांकडून अनेक प्रकारची शुल्क आकारली जातात. त्यामुळे त्या सर्वांबद्दल आधीच माहिती घ्या. यामध्ये प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेशन फी आणि जीएसटी (GST) यांचा समावेश असतो.
व्याजदरात बदल
जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलं असेल, तर व्याज दर कधी आणि कसे बदलले जातील, याची माहिती ठेवा. त्यामुळे लोन करारामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या शंकांचं निरासन झाल्यावरच स्वाक्षरी करा.
