शेअर बाजारातील एसव्हीपी ग्लोबल टेक्सटाइल्स (SVP Global Textiles) या १० रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या शेअरने बुधवारी जबरदस्त उसळी घेतली. या 'पेनी स्टॉक'ने सलग दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांचा अपर सर्किट गाठला. यामुळे हा शेअर इंट्रा-डेमध्ये ५.६८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. डिसेंबर २०२४ नंतर प्रथमच हा शेअर या स्तरावर पोहोचला आहे.
गेल्या चार सत्रांपासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात एसव्हीपी ग्लोबल टेक्सटाइल्सच्या शेअरच्या किमतीत तब्बल ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. काही दिवस ही तेजी अशीच कायम राहिली तर, डिसेंबर २०१७ नंतर प्रथमच या शेअरमध्ये अशी तेजी दिसून येईल.
२०२५ मध्ये आतापर्यंत या पेनी स्टॉकने १०.३० टक्क्यांचा सकारात्मक परतावा दिला आहे. जर हा स्टॉक सकारात्मक नोंदीसह वर्षाचा शेवट करण्यात यशस्वी ठरला, तर गेल्या तीन वर्षांत प्रथमच त्याचा वार्षिक परतावा सकारात्मक असेल.
अशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती - शेअरमधील या तेजीमागे कंपनीची आर्थिक स्थिती मात्र चिंताजनक आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर तिमाहीतील त्यांचा महसूल (Revenue) शून्य होता, कंपनीला ५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मार्च २०२३ पासून कंपनी नफ्यासाठी झुंजत आहे. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये कंपनीने ७१ कोटींचा नफा कमावला होता, यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा झालेला नाही. कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांचा (Retail Investors) हिस्सा ४७ टक्के एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
