बीजिंग - बेरोजगारीचा परिणाम अनेकदा कुटुंबांवर, नातेसंबंधांवर होत असतो. चीनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंबांवर, नात्यांवर होऊ नये म्हणून चीनमधील बेरोजगारांनी आणि काही कंपन्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
चीनमधील तरुण ‘नोकरीत’ दिसण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. अनेक कंपन्या बेरोजगार लोकांना त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून त्यांची बेरोजगारी लपवण्यास मदत करण्यासाठी ‘काम करण्याचे नाटक करण्याची’ सेवा देत आहेत. काही कंपन्या दररोज सुमारे ३० युआन (२९० रुपये) शुल्क आकारून ऑफिसची जागा, संगणक आणि फोनसह मॉक वर्कस्टेशन्स देऊ करतात. (वृत्तसंस्था)
सामाजिक दबावामुळे हे नाटक
अनेक कंपन्या सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करण्याची संधी देत आहेत. ज्यात जेवणाची वेळदेखील समाविष्ट आहे. हांग्झो येथील एका माजी ई-कॉमर्स कर्मचाऱ्याची नोकरी गेली.
त्याचे कुटुंब त्यामुळे काळजीत पडेल यासाठी तो कामावर जाण्याचा दिखावा करतो. एका तरुणाने मैत्रिणीने नाते तोडू नये यासाठी नोकरी गेल्याचे लपवले.
आळस वाढविणाऱ्याही कंपन्या, हॉटेल
एकीकडे बेरोजगारी लपविण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या सेवा देत असतानाच लोकांना पूर्वीपेक्षा जास्त आरामदायी सुविधा देत त्यांच्या आळसाला खतपाणी घालण्याऱ्या कंपन्या तसेच हॉटेलही उघडली असून तशा सेवा पुरवल्या जात आहेत.
अर्थात हे होतेय ते अमेरिकेत. यात काही हॉटेल लायब्ररीची सेवा पुरवत आहे, तर काही आरामात पडून राहण्यासाठी सोकिंग टबसारख्या सुविधा देत आहे. हिवाळ्याच्या काही महिन्यांत थंडीमुळे काहीही काम करावेसे वाटत नाही, त्या काळात या सुविधा अधिक प्रमाणात पुरवल्या जातात.
बेरोजगारीचा दर ५.१ टक्क्यांवर
चीनमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर ५.१ टक्क्यांवर पोहोचला. बेरोजगारी आणि सामाजिक दबावामुळेच नोकरी करण्याच्या दिखाव्याला किंवा नाटकाला प्रोत्साहन देण्याऱ्या विविध प्रकारच्या सेवांचा जन्म झाला असल्याचे येथील वुहान विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासक प्राध्यापकांनी म्हटले आहे.