Post Office posb accounts : तुम्हाला जर पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायचे असेल तर आनंदाची बातमी आहे. कारण, आता फक्त आधारकार्डद्वारे तुमचं काम होणार आहे. पोस्ट ऑफिसने पोस्ट ऑफिस बचत खाते (POSB) आणि आधार बायोमेट्रिक्सद्वारे व्यवहार करण्यासाठी (e-KYC) प्रक्रिया सुरू केली आहे. पोस्ट ऑफिस हळूहळू eKYC प्रक्रिया अपडेट करणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा फक्त POSA आणि पोस्ट ऑफिस काउंटरवर उपलब्ध असेल. यामध्ये नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याची आणि व्यवहार करण्याची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, विद्यमान ग्राहकांचे eKYC आणि KYC तपशील अपडेट केले जातील.
पुढील टप्प्यात, खाते उघडणे, बंद करणे आणि आरडी, टीडी,एमआयएस, एससीएसएस सारख्या इतर योजनांसाठी ई-KYC द्वारे व्यवहार करणे यासारख्या सुविधा पुरवल्या जातील. मात्र, सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे केवळ ५,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार केले जातील. यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी व्हाउचर वापरावे लागेल. ही संपूर्ण यंत्रणा पोस्ट ऑफिसच्या फिनाकल सॉफ्टवेअर अंतर्गत काम करेल. त्यासाठी त्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
आधार अपडेट करणे आवश्यक
टपाल विभागाच्या १ जानेवारी २०२५ च्या आदेशानुसार, “मूलभूत बचत खाते आणि सिंगल टाईप POSA (पोस्ट ऑफिस बचत खाते) खाती केवळ आधार प्रमाणीकरणाच्या आधारावर फिनेकल सॉफ्टवेअरमध्ये उघडली जातील. त्याच वेळी, इतर योजनांची खाती उघडण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असेल. याशिवाय खाते बंद करणे, हस्तांतरण आदी सुविधाही या सॉफ्टवेअर अंतर्गत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर एखाद्या व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायचे असेल, परंतु आधार अपडेट नसेल तर त्याचे खाते आधार बायोमेट्रिक अंतर्गत उघडले जाणार नाही. अशा लोकांना आधी आधार अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात टपाल विभाग ई-केवायसीद्वारे खाती उघडणे किंवा व्यवहार करण्यासह इतर सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. आगामी काळात विभाग नवीन ग्राहक आणि खातेदारांसाठी इतर प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. पेपरलेस कामासाठी पोस्ट ऑफिस वेगाने डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल करत आहे. विभागाने आपल्या ग्राहकांना आधार बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात खाते उघडणे आणि पोस्ट ऑफिसमधील व्यवहारांसह अनेक कामांसाठी आधार आवश्यक होणार आहे.
देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ६ जानेवारीपासून प्रक्रिया लागू
पोस्ट ऑफिस कार्यालयात eKYC करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर २०२४ पासून देशातील १२ मुख्य टपाल कार्यालये आणि २ उप पोस्ट कार्यालयांमध्ये एका पथदर्शी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आली होती. परंतु, ६ जानेवारीपासून ती संपूर्ण भारतात लागू करण्यात येणार आहे. याअंतर्गत देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये नवीन एकल बचत खाती उघडण्यात येणार आहेत. त्याचवेळी, जुन्या खातेधारकांना देखील eKYC शी लिंक केले जाईल.