Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. यापूर्वीच सरकारने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली होती. सिंधू पाणी करार आणि अटारी बॉर्डरवरुन होणारा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला. यानंतर आता भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सीमाभागात थेट हल्ला करुन उरलेली कसरही भरुन काढली आहे. भारताच्या हल्ल्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावर दिसून येत आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्याने पाकिस्तानचा महसूल बंद झाला असून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
भारतीय लष्कराने मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांनी तातडीने आपले हवाई क्षेत्र आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी बंद केलं आहे. इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक विमानतळांवरील कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
जगभरातील विमान कंपन्यांनीही मार्ग बदलले
पाकिस्तानचे हवाई क्षेत्र ओसाड पडले आहे. भारतासोबत वाढत्या तणावामुळे केवळ भारतीय विमान कंपन्याच नव्हे तर जगभरातील विमान कंपन्यांनीही त्यांचे उड्डाण मार्ग बदलले आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने पाकिस्तानचा मोठा महसूल बुडत आहेत. भारतीय विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र बंद करुन पाकिस्तानने आधीच पायावर धोंडा मारुन घेतला आहे. आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अजून खिळखिळी होण्याची शक्यता आहे.
वाचा - चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
एअर फ्रान्सलाही पाकिस्तानची हवाई हद्द नको
सीएनएनच्या मते, अनेक प्रमुख विमान कंपन्या पाकिस्तानवरून उड्डाण करणे टाळत आहेत. हा जागतिक प्रवासात व्यत्यय आणणारा नवीन भू-राजकीय मुद्दा आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर फ्रान्सने पुढील सूचना मिळेपर्यंत दक्षिण आशियाई देशावरून उड्डाणे स्थगित केल्याचे म्हटले आहे. फ्रेंच एअरलाइन्सने सांगितले की एअरलाइन काही ठिकाणी त्यांच्या फ्लाइट्समध्ये बदल करत आहे, तसेच काही मार्गांना जास्त उड्डाण वेळ लागेल असे म्हटले आहे.