Operation Sindoor: पाकिस्ताननं गुरुवारी रात्री आठ वाजता भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडलं. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. जमिनीसोबतच भारत सरकार आणि लष्कर राजनैतिक आणि आर्थिक आघाडीवरही पाकिस्तानला घेरत आहे. आज वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) महत्त्वाची बैठक होणार असून त्यात भारत या शेजारी देशाला आर्थिक पॅकेज देण्यास विरोध करणार आहे. पाकिस्तानसाठीच्या बेलआऊट पॅकेजबाबत भारत आयएमएफला आपलं मत कळवू शकतो, असं भारत सरकारनं गुरुवारी सांगितलं.
आयएमएफ आज पाकिस्तानच्या एक्सटेंडेड फंडिंग फॅसिलिटीचा (EFF) आढावा घेणार आहे. यानंतर पाकिस्तानला १.३ अब्ज डॉलर्सचं (सुमारे ११.३० हजार कोटी रुपये) कर्ज द्यायचं की नाही याचा निर्णय घेतला जाईल. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी, आयएमएफचे भारताचे कार्यकारी संचालक शुक्रवारी जागतिक संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देशाची बाजू मांडणार असल्याचं म्हटलं.
... तर उपासमारीची वेळ
वास्तविक, पाकिस्तान गेल्या ३-४ वर्षांपासून कॅशचं संकट आणि महागाईशी झगडत असून त्यावर मात करण्यासाठी पाकिस्ताननं आयएमएफसह अनेक देशांची मदत मागितली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला आर्थिक स्थैर्यासाठी बेलआऊट पॅकेज दिलंय. पाकिस्तान हा पैसा विकासासाठी वापरण्याऐवजी दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी वापरतो, असा आरोप भारतानं यापूर्वीच केलाय. त्यामुळे असं कोणतेही कर्ज मंजूर करू नये, असं भारतानं म्हटलंय.
आधीच आर्थिक ऱ्हासाच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसाठी एकमेव आशा शिल्लक आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या पाकिस्तानसाठी आयएमएफकडून कर्ज घेणं म्हणजेच बेलआऊट पॅकेज हे जीवन-मरणाइतकंच महत्त्वाचं आहे.