आपल्यापैकी अनेकांना स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा असते. खासगी क्षेत्रात नोकरी करताना दिवसातून किमान एकदा तरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येतच असतो. पण आपण फक्त विचार करण्यातच वेळ घालवतो, कृती मात्र करत नाही. नियोजनही फक्त कागदावरच राहते. असाच विचार कोल्हापूरातील अद्वैत कुलकर्णी यांना रोज यायचा. एक दिवस ते मित्रांसोबत त्रिपुरा फिरायला गेले. मित्रांसोबत फिरले पर्यटनस्थळ बघितली, तिथली शेतीची माहिती घेतली. सहलीचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर ज्यावेळी ते घरी परतत होते, तेव्हा त्यांच्या डोक्यात व्यवसायाचा ठोस प्लॅन तयार झाला. तीच ट्रिप त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली.
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
वर्ष होते २०१७ चे
कोल्हापूरचा अद्वैत कुलकर्णी हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. २०१७ मध्ये तो सुट्टीसाठी त्रिपुराला गेला होता. मित्रांसोबत त्याने त्रिपुरातील अनेक ऐतिहातिस ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी त्याने तिथल्या शेतीलाही भेट दिली. तिथल्या मोठ- मोठ्या अननसाच्या बागा त्याला आवडल्या. यावेळी त्याच्या डोक्यात व्यवसायाचा विचार घोळायला लागला. त्याने त्या बागांमध्ये व्यवसायाची संधी शोधली. एकदा जाऊन आल्यानंतर तो पुन्हा एकदा त्रिपुराला गेला.
२०१७ ते २०२० या काळात त्याने त्रिपुरातील अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी त्याला अननस फक्त स्वस्त असल्याचे नाही तर इतर राज्यांच्या तुलनेत उत्पादनही खूप जास्त असल्याचे दिसले. हे उत्पादन जास्त आहे, काही ठिकाणी तर अननस मोठ्या प्रमाणात वाया गेल्याचे दिसले. त्रिपुरातील ‘क्वीन अननस’ या जातीला २०१५ मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. या फळाला राज्याचे अधिकृत फळ मानले जाते.
सुरू केला छोटा व्यवसाय
यावेळी त्याने घरी येऊन सगळ्या गोष्टींची चर्चा केली. त्याच्या डोक्यात असणारा प्लान त्याने घरच्यांना सांगितला. घरच्यांनीही लगेच सपोर्ट दिला. त्याने वडिलांकडून प्रेरणा घेतली. तसेच एका जाणकार मित्राचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन, अद्वैतने २०२१ मध्ये कुमारघाट परिसरातील बंद पडलेले युनिट पुन्हा सुरू केले. याच ठिकाणी त्याने ‘ननसेई फ्रूट्स एंड वेजिटेबल्स प्रोडक्ट्स इंडस्ट्री’ सुरू केला आणि कॅन केलेल्या अननसाच्या स्लाईसचे उत्पादन चालू केले. अवघ्या तीन वर्षांत अद्वैतच्या कंपनीने १.५ कोटींची वार्षिक उलाढाल केली.
कुमारघाटमध्ये सर्वात जास्त अननसाचे उत्पादन
कुमारघाट हा त्रिपुरातील सर्वात मोठा अननस उत्पादक प्रदेश आहे. या प्रदेशात अननसावर प्रक्रिया करणाऱ्या फॅक्टरींची कमतरता होती. यामध्येच त्याने संधी शोधली. स्थानिक शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून त्याने तिथली बंद पडलेली फॅक्टरी खरेदी केली.
कंपनी दररोज ४००० अननसांची खरेदी करते
कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे ४,००० अर्धपिकलेले अननस खरेदी करण्यास सुरुवात केली. यामुळे सुमारे ६० शेतकऱ्यांना थेट पैसे मिळण्यास सुरुवात झाली. प्रति अननस १० ते १५ रुपये असा दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे आणि नियमित उत्पन्नाचे साधन बनले.
महिलांना रोजगारही मिळाला
या फॅक्टरीमध्ये ३० महिला कामगार काम करतात. त्या अननस सोलणे, कापणे आणि साखरेच्या पाक व सायट्रिक अॅसिडच्या मिश्रणात प्रक्रिया करून कॅनिंगची जबाबदारी संभाळतात. तयार उत्पादन दोन वर्षापर्यंत टीकते.
या फॅक्टरीची मासिक उत्पादन क्षमता ७०,००० ते ७५,००० कॅन्स आहे आणि तयार उत्पादने दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटीसह प्रमुख शहरांना पुरवली जातात.
वार्षिक उलाढाल १.५ कोटी
अद्वैत कुलकर्णी यांचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. स्थापनेच्या अवघ्या तीन वर्षात, त्यांच्या कंपनीने २०२३-२४ आर्थिक वर्षात वार्षिक उलाढाल १.५ कोटीपर्यंत पोहोचवली. या आर्थिक वर्षात हा आकडा वाढून ३ कोटी होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. हे यश प्रामुख्याने अननसाच्या दोन प्रमुख जातींच्या प्रभावी वापरामुळे मिळाले - 'क्वीन', हे ज्यूस काढण्यासाठी योग्य आहे आणि 'केव', हे कॅनिंगसाठी योग्य आहे.
त्रिपुरामध्ये व्यवसाय करणे कठीण आहे. अंतर आणि भौगोलिक आव्हानांमुळे, गुवाहाटीसारख्या बाजारपेठेतून कच्चा माल मिळवणे आणि दिल्लीहून टिन कंटेनर मिळवणे कठीण आहे. असे असूनही, पुढील काही वर्षांत त्यांचे वार्षिक उत्पन्न ८-१० कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
त्रिपुरातील शेतीसाठी मोठं काम
स्थानिक शेतीला आकार देण्यातही अद्वैत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी त्रिपुरामध्ये मक्याची लागवड यशस्वीरित्या सुरू केली. महाराष्ट्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांनी राज्य सरकारच्या कृषी विभागाशी भागीदारी केली. सरकारने बियाणे आणि माती तयार करण्यास मदत केली. सध्या ३०-४० हेक्टर जमिनीवर मक्याची लागवड केली जाते. यापैकी ७०% शेतकरी आदिवासी समुदायातील आहेत. भात कापणीनंतर लगेचच हे पीक तयार होते, यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे.
