ट्रम्प टॅरिफमुळे एकीकडे अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली आहे. मात्र, यातच ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ७.३३% ने वधारून ५८.०१ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सुमारे २०% ची वाढ झाली आहे. तर गेल्या ३० दिवसांत, हा शेअर ४७% पर्यंत वधारला आहे.
महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीला फार अधिक नुकसान झाले असताना ही तेजी दिसून येत आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिकच्या स्टॉक्समध्ये आलेली ही तेजी कायम राहू शकेल का? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.
यामुळे आली तेजी... -
खरे तर, ओला इलेक्ट्रिकला आपल्या Gen-3 स्कूटर रेंजसाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI) स्कीमअंतर्गत मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे कंपनीला आपल्या विक्रीवर 13% ते 18% पर्यंतचा फायदा होऊ शकतो आणि हा लाभ 2028 पर्यंत सुरू राहू शकतो. यामुळे केवळ खर्चच कमी होणार नाही, तर नफाही वाढेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
ओलाचे म्हणणे आहे की, आपल्या एकूण विक्रीत अर्ध्याहून अधिक वाटा Gen-3 स्कूटरचा आहे. आता Gen-2 आणि Gen-3 दोन्ही रेंजला हे सर्टिफिकेशन मिळाल्याने, आता उद्योगात आणखी स्थिरता तसेच तेजी येण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे EBITDA पातळीवर सकारात्मक परिणाम होईल.
पहिल्या तिमाहीत घाटा -
महत्वाचे म्हणजे, जून तिमाहीच्या निकालानुसार, कंपनीला अजूनही नुकसानाचा सामना करावा लागला. यावेली ओला इलेक्ट्रिकचा घाटा वाढून ₹428 कोटी राहिला. तर गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हे नुकसान ₹347 कोटी रुपये एवढे होते. याशिवाय, कंपनीचा रेव्हेन्यूदेखील वार्षिक आधारावर 50% ने कमी होऊन 828 कोटी रुपयेच राहिला आहे. जो गेल्या वर्षाच्या याच कालावधीत 1,644 कोटी रुपये एवढा होता.