भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकनं गुरुवारी (२९ मे) २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत (Q4FY25) कंपनीचा तोटा ₹८७० कोटींवर पोहोचला. मागील आर्थिक वर्षाच्या समान तिमाहित म्हणजेच (Q4FY24) याच कालावधीत कंपनीला ₹४१६ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. दरम्यान, कंपनीनं चालू आर्थिक वर्षात नफा कमावण्याचे उद्दिष्ट असल्याचं म्हटलं आहे.
महसुलात ५९% ची घसरण
कंपनीचं ऑपरेटिंग उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १,५९८ कोटी रुपयांच्या तुलनेत ५९% ने कमी होऊन ६११ कोटी रुपये झाले असल्याची माहिती शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात ओला इलेक्ट्रिकनं दिली.
आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीला २,२७६ कोटींचा निव्वळ तोटा झाला, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये १,५८४ कोटी रुपये होता. त्याच वेळी, ऑपरेशनल महसूल आर्थिक वर्ष २४ मध्ये ५,०१० कोटी रुपयांवरुन आर्थिक वर्ष २५ मध्ये ४,५१४ कोटी रुपयांवर घसरला.
नफ्याचं लक्ष्य
कंपनीनं आर्थिक वर्ष २६ मध्ये नफा कमविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. "आर्थिक वर्ष २६ मध्ये, आमचं लक्ष्य महसूल वाढवण्यावर आणि ऑपरेटिंग लीव्हरेज मजबूत करण्यावर असेल, जेणेकरून आम्ही स्थायी नफ्याकडे वाटचाल करू शकू,” असंही कंपनीनं निवेदनाद्वारे म्हटलं.
ग्रॉस मार्जिनमध्ये मजबूतीचे संकेत
आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीच्या ग्रॅास मार्जिनमध्ये वार्षिक आधारावर ३८% ची वाढ झाली आहे. तर आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत त्यात १०% नं वाढ झालीये.
आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीनं ३,५९,२२१ युनिट्सच्या विक्रीसह बाजारपेठेत आपलं आघाडीचं स्थान कायम ठेवलं असल्याची माहिती कंपनीनं दिली. तर आर्थिक वर्ष २४ मध्ये ही संख्या ३,२९,५४९ युनिट्स होती. कंपनीच्या सुधारित जेन ३ एस१ स्कूटर पोर्टफोलिओमुळे ही कामगिरी साध्य करता आली आहे.