Oil India Ltd : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावरून अनिश्चितता असताना, भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या थार वाळवंटातील जोधपूर सॅण्डस्टोन फॉर्मेशनमधून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने आता प्रतिदिन १,२०२ बॅरल तेल काढण्याची क्षमता गाठली असून, गेल्या वर्षीच्या (७०५ बॅरल) तुलनेत यात ७० टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
थारच्या आव्हानात्मक परिस्थितीत 'थर्मल' तंत्रज्ञानाची कमाल
थार वाळवंटातील बाघेवाला तेल क्षेत्रातून तेल काढणे हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कठीण काम होते. येथील तेल अत्यंत घट्ट असल्याने पारंपारिक पद्धतीने ते बाहेर काढणे कठीण होते. यासाठी कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन : हे एक प्रगत थर्मल तंत्रज्ञान असून २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले होते. आता ते मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे.
विक्रमी कामगिरी: कंपनीने आतापर्यंत १९ विहिरींमध्ये यशस्वीरित्या CSS प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच १३ नवीन विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे.
जैसलमेर ते गुजरात: असा होतो तेलाचा प्रवास
- बाघेवाला (जैसलमेर) क्षेत्रातून काढलेले हे कच्चे तेल एका विशेष प्रक्रियेद्वारे रिफायनरीपर्यंत पोहोचवले जाते.
- वाहतूक: टँकरच्या माध्यमातून हे तेल गुजरातच्या ONGC सुविधा केंद्रापर्यंत नेले जाते.
- पाइपलाइन : तेथून पाइपलाइनद्वारे हे तेल कोयली रिफाइनरीकडे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते.
- उत्पादन आकडेवारी : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या क्षेत्रातील एकूण उत्पादन ४३,७७३ मेट्रिक टन नोंदवले गेले आहे, जे गेल्या वर्षीच्या ३२,७८७ मेट्रिक टनपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे.
वाचा - इराण युद्धामुळे अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर; डिझेलच्या दरात ४७% वाढीने मोडले सामान्यांचे कंबरडे
उत्पादनासाठी वापरलेली अत्याधुनिक यंत्रणा
- बाघेवाला तेल क्षेत्रात सध्या एकूण ५२ विहिरी असून त्यापैकी ३३ विहिरी सक्रिय आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ऑइल इंडियाने खालील प्रगत तंत्रांचा वापर केला आहे.
- फिशबोन ड्रिलिंग आणि बेअरफूट कॉम्प्लिशन.
- इलेक्ट्रिक डाउनहोल हीटर्स आणि हायड्रॉलिक सकर रॉड पंप्स.
- हाय-टेम्परेचर थर्मल वेलहेड्स आणि आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टीम.
