NSDL IPO Investment: एनएसडीएलचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ४,०११.६० कोटी रुपयांचा हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे. याचा अर्थ असा की इश्यूमधून येणारे पैसे कंपनीकडे जाणार नाहीत तर त्या प्रमोटर्सच्या खिशात जातील, जे या इश्यूद्वारे एनएसडीएलमधील त्यांचा हिस्सा विकत आहेत. या आयपीओच्या शेअर्ससाठी गुंतवणूकदार १ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. शेअर्सचे वाटप ४ ऑगस्ट रोजी होऊ शकतं आणि त्याची बीएसईवर ६ ऑगस्ट रोजी या शेअरचं लिस्टिंग होऊ शकतं. आयपीओ उघडण्यापूर्वी एनएसडीएलनं अँकर गुंतवणूकदारांकडून १,२०१ कोटी रुपये उभारले आहेत. एलआयसी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) हे देखील अँकर गुंतवणूकदारांमध्ये आहेत.
एनएसडीएल डिपॉझिटरी सेवा देते. ही सेबीद्वारे नोंदणीकृत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन (MII) आहे, जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं सिक्युरिटीज ठेवण्यास आणि व्यवहारांचं सेटलमेंट करण्यास मदत करते. एनएसडीएलने हा आयपीओ बाजार नियामक सेबीच्या आवश्यकतेनुसार आणला आहे. हा आयपीओ भांडवल उभारणी किंवा विस्तार करण्याच्या उद्देशानं आणण्यात आलेला नाही.
प्राईज बँड काय?
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO साठी कंपनीनं ७६० ते ८०० रुपये प्रति शेअरचा प्राईज बँड निश्चित केलाय. कंपनीनं १८ शेअर्सचा एक मोठा लॉट तयार केला आहे. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये पैसे गुंतवू शकतो. कंपनीनं कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ७६ रुपयांची सूट दिली आहे. एनएसडीएलचा आयपीओ ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान खुला असेल.
NSDL IPO चा GMP किती?
एनएसडीएल आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे. ग्रे मार्केट ट्रॅकिंग वेबसाइट IPOwatch.in नुसार, आज NSDL IPO चा GMP १२७ रुपये आहे. याचा अर्थ, अपर बँडनुसार NSDL चे शेअर्स १५ टक्के लिस्टिंग गेन देऊ शकतात.
कोणासाठी किती हिस्सा राखीव?
या IPO मधील जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा QIB श्रेणीमध्ये राखीव ठेवला जाईल. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव ठेवला जाईल. तर, किमान १५ टक्के हिस्सा NII श्रेणीमध्ये राखीव ठेवला जाईल. एनएसडीएलच्या आयपीओचा आकार ४०११.६० कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे ५.०१ कोटी शेअर्स जारी करेल. हा शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केला जाईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)