नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ज्युनिओ पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे खास अल्पवयीनांसाठी तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याद्वारे मुले खात्याशिवाय यूपीआय पेमेंट करू शकतील.
सूत्रांनी सांगितले की, आरबीआयच्या मंजुरीनंतर ज्युनिओ असे डिजिटल वॉलेट आणणार आहे जे वापरकर्त्यांना, विशेषतः अल्पवयीन मुलांना, बँक खाते नसतानाही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची परवानगी देईल.
काय आहे ज्युनिओ? : ज्युनिओ ही अंकित गेरा आणि शंकर नाथ यांनी स्थापन केलेली एक फिनटेक कंपनी आहे. ती मुलांना जबाबदारीने पैसे हाताळायला शिकवते. कंपनीच्या ॲपद्वारे पालक पैसे पाठवू शकतात, खर्चाची मर्यादा ठरवू शकतात व व्यवहार पाहू शकतात. यात बचत ध्येय, रिवॉर्डस्, शिकण्यासाठी गेमसदृश फीचर्स आहेत.
कंपनीकडे आधीच २० लाखांहून अधिक युवा वापरकर्ते आहेत आणि लवकरच ती यूपीआय रिवॉर्ड पॉइंट्स आणि प्रवास पेमेंट्स यांसारखे नवे फीचर्स आणणार आहे. हा उपक्रम ‘एनपीसीआय’च्या ‘यूपीआय सर्कल’ योजनेशी सुसंगत आहे.
