Gautam Adani News: अदानी समूह आता भारतात विमानं असेंबल करण्याच्या तयारीत आहे. समूहाची कंपनी 'अदानी एरोस्पेस अँड डिफेन्स'नं भारतात व्यावसायिक विमानं बनवण्यासाठी ब्राझीलच्या 'एम्ब्रेयर' (Embraer) कंपनीसोबत एक मोठा करार केला आहे. हा करार भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत देशांतर्गत विमान निर्मितीला चालना देईल. यामुळे भारतात रिजनल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (Regional Transport Aircraft) म्हणजेच छोट्या प्रवासी विमानांची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण इकोसिस्टम तयार होईल.
नागरी उड्डयन मंत्रालयात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या उपस्थितीत दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाला. एअरबस आणि बोईंग नंतर एम्ब्रेयर ही जगातील तिसरी सर्वात मोठी विमान निर्माता कंपनी आहे. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे संचालक जीत अदानी यांनी सांगितलं की, या प्रकल्पाची वेळमर्यादा आणि इतर तपशील पुढील काही महिन्यांत समोर येतील आणि निवडलेल्या जागेवर लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हायब्रिड ATM मधून निघणार ₹१०, ₹२० आणि ₹५० च्या नोटा; टंचाई दूर करण्यासाठी तयारी
संपूर्ण इकोसिस्टम तयार होणार
विमानांची जुळणी करण्याव्यतिरिक्त, दोन्ही कंपन्यांना रिजनल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टसाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करायची आहे. यामध्ये विमानाची निर्मिती, पुरवठा साखळी, आफ्टरसेल्स सर्व्हिस, एमआरओ आणि पायलट ट्रेनिंग यांचा समावेश असेल. एम्ब्रेयर कमर्शियल एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ अर्जन मेइजर यांनी सांगितले की, अदानी यांची औद्योगिक क्षमता आणि एम्ब्रेयरचे तांत्रिक कौशल्य यांच्या एकत्रित येण्यानं भारताला मोठा फायदा होईल.
भारतीय विमान वाहतूक क्षेत्राची वेगानं वाढ
नागरी उड्डाण सचिव समीर कुमार सिन्हा यांच्या मते, भारत आज जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या नागरी उड्डाण बाजारपेठांपैकी एक आहे. विमानतळांच्या पायाभूत सुविधांचा झपाट्यानं विस्तार झाला असून प्रवासी आणि मालवाहतुकीत सातत्यानं वाढ होत आहे. भारतीय एअरलाईन्सनी १८०० हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे, जे या क्षेत्रातील मजबूत वाढ दर्शवते.
एम्ब्रेयरची भारतातील उपस्थिती
एम्ब्रेयर ही कंपनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्रासाठी नवीन नाही. ब्राझीलची ही कंपनी भारतात आधीच ११ वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे ५० विमानांचं संचालन करते. ही विमानं भारतीय हवाईदल, सरकारी संस्था आणि रिजनल एअरलाइन 'स्टार एअर'द्वारे वापरली जातात. याशिवाय, एम्ब्रेयरनं महिंद्रा समूहाच्या सहकार्यानं भारतीय हवाईदलाच्या 'मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट' प्रोग्रामसाठी आपल्या C-390 मिलेनियम लष्करी मालवाहू विमानाचा प्रस्ताव देखील दिला आहे.
