Share Market Today : भारतीय शेअर बाजाराने आज, ११ सप्टेंबर रोजी सलग सातव्या दिवशी तेजी दाखवत ऐतिहासिक कामगिरी केली. निफ्टी ५० ने २५,००० चा महत्त्वाचा टप्पा पार करत विक्रमी पातळीवर क्लोजिंग दिली, तर सेन्सेक्समध्येही १०० हून अधिक अंकांची वाढ झाली. जागतिक बाजारांमधून मिळालेले मजबूत संकेत आणि भारत-अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराच्या वाढलेल्या आशांमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला.
आजच्या कामकाजाच्या शेवटी, सेन्सेक्स १२३.५८ अंकांनी म्हणजेच ०.१५% वाढून ८१,५४८.७३ वर बंद झाला. तर, निफ्टी ३२.४० अंकांनी म्हणजेच ०.१३% वाढून २५,००५.५० या विक्रमी पातळीवर बंद झाला.
क्षेत्रीय निर्देशांकांची संमिश्र कामगिरी
आज सेक्टोरल निर्देशांकांमध्ये संमिश्र कामगिरी दिसून आली. बँकिंग, ऊर्जा आणि मीडिया शेअर्सनी मजबूत कामगिरी केली. निफ्टी मीडिया सर्वाधिक १.०२% वाढला, तर निफ्टी एनर्जी ०.८८% आणि निफ्टी पीएसयू बँक ०.७४% वाढीसह बंद झाले. याशिवाय, निफ्टी इन्फ्रा आणि मेटल निर्देशांकातही अनुक्रमे ०.५५% आणि ०.३४% ची वाढ नोंदवली गेली. दुसरीकडे, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये मात्र घसरण झाली. निफ्टी ऑटो ०.३३% आणि निफ्टी आयटी ०.५% घसरला, ज्यामुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. रियल्टी निर्देशांक जवळपास सपाट राहिला.
गुंतवणूकदारांनी कमावले ७८,००० कोटी रुपये
आज ११ सप्टेंबर रोजी बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) वाढून ४५७.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे कालच्या (१० सप्टेंबर) ४५६.४५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत मोठे आहे. अशा प्रकारे, आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ७८,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढलेले आणि घसरलेले शेअर्स
आज सेन्सेक्समधील ३० पैकी १६ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये एनटीपीसीच्या शेअर्समध्ये १.६३% ची सर्वाधिक तेजी राहिली. त्यापाठोपाठ ॲक्सिस बँक, पॉवरग्रिड, भारती एअरटेल आणि इटरनल या शेअर्समध्ये १.१७% ते १.५६% ची वाढ झाली.
वाचा - कर्ज घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा? हप्ता न भरल्यास फोनवर 'रिमोट कंट्रोल', आरबीआयचा नवा नियम चर्चेत
याउलट, सेन्सेक्समधील उर्वरित १४ शेअर्समध्ये घसरण झाली. इन्फोसिसचा शेअर १.५१% घसरणीसह टॉप लूझर्स ठरला. त्याशिवाय, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्येही ०.७६% ते १.०९% पर्यंतची घट झाली.
आजची एकूण बाजाराची स्थिती
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आज वाढलेल्या शेअर्सची संख्या घसरलेल्या शेअर्सपेक्षा अधिक होती. एकूण ४,२८१ शेअर्समध्ये झालेल्या व्यवहारात २,१०८ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर २,०१२ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. १६१ शेअर्स कोणताही बदल न होता सपाट बंद झाले. आजच्या सत्रात ११३ शेअर्सनी त्यांचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर ४२ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नव्या नीचांकावर पोहोचले.