Share Market History : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तीव्र चढ-उताराने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निफ्टीने अवघ्या एका आठवड्यात ८ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली. अशा वेळी अनेक गुंतवणूकदार भीतीपोटी आपले शेअर्स विकून बाहेर पडण्याचा विचार करतात. मात्र, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बाजार तज्ज्ञांच्या मते, ही घसरण तात्पुरती असून इतिहासाकडे पाहिल्यास घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
संकट आले की बाजार सावरलाच! इतिहासातील ३ मोठी उदाहरणे
शेअर बाजाराने गेल्या २५ वर्षांत अनेक मोठे धक्के पचवले आहेत आणि प्रत्येक वेळी बाजार अधिक वेगाने सावरला आहे.
१. २०००-२००२ चा 'डॉट कॉम' फुगा
सुमारे २५ वर्षांपूर्वी इंटरनेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली होती. मात्र, २००२ मध्ये हा फुगा फुटला आणि जागतिक बाजार कोलमडले. भारतीय निफ्टी ५० देखील आपल्या उच्चांकावरून ५१ टक्क्यांनी कोसळला होता. पण, २००५ पर्यंत निफ्टीने आपली सर्व पडझड भरून काढली आणि नवीन उच्चांक गाठला.
२. २००८ चे जागतिक मंदीचे सावट
अमेरिकेतील 'लेहमन ब्रदर्स' बँक बुडाल्यानंतर जगभर आर्थिक भूकंप झाला होता. त्या काळात निफ्टी काही महिन्यांतच ५९ टक्क्यांनी कोसळला होता. ही निफ्टीच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण होती. मात्र, २०१३ पर्यंत बाजार केवळ सावरलाच नाही, तर त्याने जुने सर्व विक्रम मोडीत काढले.
३. २०२० ची कोरोना महामारी
कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे अवघ्या काही आठवड्यांत निफ्टी ३७ टक्क्यांनी गडगडला. मात्र, सरकारची मदत आणि गुंतवणूकदारांच्या प्रतिसादामुळे अवघ्या एका वर्षात बाजार मार्च २०२० च्या पातळीपासून दुप्पट झाला.
७ वर्षांच्या गुंतवणुकीत तोटा नाहीच!
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ३ नोव्हेंबर १९९५ ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. यातून काही अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत.
- सरासरी परतावा: गेल्या ३० वर्षांत निफ्टी ५० ने सरासरी १२.७४% वार्षिक परतावा दिला आहे.
- निगेटिव्ह रिटर्नची शक्यता शून्य : उपलब्ध आकडेवारीनुसार, निफ्टी ५० ने गेल्या ३० वर्षात कोणत्याही ७ वर्षे किंवा १० वर्षांच्या गुंतवणूक कालावधीत कधीही 'नेगेटिव्ह' म्हणजेच उणे परतावा दिलेला नाही.
- नुकसान कायमस्वरूपी कधी होते?: जेव्हा बाजार कोसळतो आणि गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकतात, तेव्हाच त्यांचे नुकसान 'कागदावरून प्रत्यक्षात' येते. जे गुंतवणूकदार दीर्घकाळ थांबतात, त्यांना बाजाराच्या रिकव्हरीचा फायदा मिळतोच.
गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा 'सक्सेस मंत्र'
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अर्थव्यवस्था मजबूत असेल आणि कंपन्यांची प्रगती सुरू असेल, तर अल्पकालीन चढ-उतार हे केवळ 'खरेदीची संधी' असतात. ७ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना बाजाराने कधीही निराश केलेले नाही, हे इतिहासावरून सिद्ध झाले आहे.
वाचा - गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
