WhatsApp Scam : तुमच्या व्हॉट्सॲपवर 'RTO चलान थकीत आहे' असा मेसेज आला तर सावधान! पोलिसांचा अधिकृत मेसेज समजून त्यावर क्लिक करणे तुम्हाला महागात पडू शकते. देहराडूनमध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीला अशाच एका बनावट मेसेजने ३.६ लाख रुपयांचा चुना लावला आहे. सायबर भामट्यांनी आता लोकांच्या मनात भीती निर्माण करून लुटण्यासाठी 'RTO चलान'चा नवा फंडा शोधला आहे.
नेमकी घटना काय?
गेल्या २७ डिसेंबर रोजी पीडित व्यक्तीला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज आला. यामध्ये 'RTO Challan.APK' नावाची एक फाईल होती. आपल्या वाहनाचा दंड थकीत असावा, या समजातून त्यांनी ती फाईल डाऊनलोड करून उघडली. फाईल उघडताच काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट होण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे भामट्यांनी त्यांच्या खात्यातून एकूण ३.६ लाख रुपये लंपास केले.
काय आहे ही 'APK' फाईलची भानगड?
सायबर तज्ज्ञांच्या मते, ठग पाठवत असलेल्या या APK फाईल्समध्ये 'मालवेअर' किंवा धोकादायक सॉफ्टवेअर असते. ही फाईल इन्स्टॉल करताच तुमच्या मोबाईलचा पूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. तुमचे बँकिंग ॲप्स, पासवर्ड, मेसेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP हॅकर्सना त्यांच्या स्क्रीनवर स्पष्ट दिसतात. अनेकदा हे मालवेअर तुमचे कॉल्स आणि मेसेजेस फॉरवर्ड करतात, ज्यामुळे तुम्हाला पैसे चोरीला गेल्याचे अलर्ट्सही मिळत नाहीत.
पोलीस तपासात काय समोर आले?
पीडित व्यक्तीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलची टीम सध्या त्या मोबाईल क्रमांकाचा आणि पैशांच्या प्रवासाचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात हे रॅकेट आंतरराज्यीय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्वतःचा बचाव कसा कराल?
- RTO किंवा कोणताही सरकारी विभाग कधीही व्हॉट्सॲपवर 'APK' फाईल पाठवत नाही. अधिकृत चालान नेहमी SMS द्वारे किंवा पत्राद्वारे कळवले जाते.
- अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर किंवा फाईलवर चुकूनही क्लिक करू नका.
- तुम्हाला दंड तपासायचा असल्यास थेट सरकारच्या 'परिवहन' वेबसाईटवर किंवा अधिकृत ॲपवर जाऊन तपासा.
- आपल्या स्मार्टफोनमध्ये चांगला 'ॲन्टी-मालवेअर' प्रोग्राम ठेवा आणि वेळोवेळी स्कॅन करा.
