-डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक
शेअर बाजाराने बजेट ना साकारात्मक घेतले ना नकारात्मक. प्रचंड अस्थिरतेच्या छायेत बाजाराने व्यवहार केले. बजेट सुरु होण्यापूर्वी बाजार सुरु झाल्यावर थोडा दबावात होता. त्यानंतर हळू हळू तेजी घेत सकाळी ११.३० पर्यंत उच्चतम पातळी गाठली. अर्थमंत्री बजेट सादर करीत होत्या तसतसे बाजार अस्थिर होत गेले. बजेटमधून गुंतवणुकीच्या संधी नेमक्या कुठे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
येणाऱ्या पाच वर्षात सहा क्षेत्रांत आमूलाग्र बदल केले जाण्याचे संकेत दिले आहेत. यात कर प्रणाली, ऊर्जा क्षेत्र, शहरी विकास, खाण क्षेत्र, वित्तीय क्षेत्र हे पाच विभाग महत्त्वाचे आहेत आणि याच क्षेत्रांत गुंतवणुकीच्या संधी शोधाव्या लागतील.
१२ लाख करमुक्त उत्पन्न मध्यमवर्गीय करदात्यांना सरकारने मोठ्या प्रमाणात खुश केले आहे. यामुळे या स्लॅबमध्ये येणाऱ्या करदात्यांचे तब्बल एक लाख कोटी रुपये वाचणार आहेत. ही रक्कम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाजारात येणार. याचाच अर्थ कंझम्पशन क्षेत्रातील कंपन्यांना याचा थेट फायदा होणार. यात कंझ्यूमर पेरिशेबल आणि ड्यूरेबल्स, वाहन, लाइफ स्टाइल, मोबाइल आणि पर्सनल गॅझेट निर्मिती क्षेत्रांतील कंपन्यांना चांगले दिवस येतील. अशा कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.
पर्यटन क्षेत्रासाठी प्रोत्साहन नवीन छोटी हेलीपॅड आणि विमानतळे वाढणार आहेत. यामुळे हॉटेल्स, विमान कंपन्या, पर्यटन कंपन्या, पर्यटन निगडित ई-कॉमर्स कंपन्या यांचा व्यवसाय वाढेल. अशा कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.
शहर विकास : सार्वजनिक वाहतूक जसे बस, मेट्रो रस्ते या पायाभूत सुविधांवर खर्च होईल. या विभागाशी निगडित कंपन्या उदा मेट्रो निर्मितीसाठी आवश्यक सामग्री, ई-बस निर्मिती, मेटल आणि सिमेंट आणि पायाभूत सुविधा उत्पादन कंपन्या तेजीत राहतील.
ऊर्जा क्षेत्र पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना पुढील काळ उत्तम राहील. विशेषतः सोलर पॅनल कंपन्या, हायड्रो पॉवर कंपन्या, विंड एनर्जी यात कार्यरत कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे.
वित्तीय सुधारणा अर्थमंत्र्यांनी वित्तीय क्षेत्रात आमूलाग्र बदल केला जाणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत. यामुळे बँकिंग आणि नॉन बैंकिंग क्षेत्रातील संस्था तेजीत राहतील. गृह कर्ज, सूक्ष्म आणि अति सूक्ष्म व्यवसाय कर्ज देणाऱ्या संस्था, इन्शुरन्स सेवा प्रधान करणाऱ्या वित्तीय संस्था यांना येणार काळ उत्तम राहू शकतो. या क्षेत्रांशी संबंधित वित्तीय संस्थांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी राहील.
याचा बरोबर शेती आणि निर्यात या क्षेत्रांत सरकार अधिक लक्ष घालणार आहे. एकूणच आगामी वित्तीय वर्षासाठी सादर केलेलं बजेट हे भारताची विकासाची दिशा अधिक गतीने वाढविणारी राहील. यामुळे गुंतवणूकदारांना वरील क्षेत्रांतील उत्तम कंपन्या हेरून त्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा विचार अवश्य करता येईल.
(टीप - यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)