New Fastag Rule: महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण १५ नोव्हेंबर पासून केंद्र सरकारनं टोल टॅक्स भरण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल लागू केला आहे. सरकारचा दावा आहे की, हा नवीन नियम केवळ महामार्गावरील ट्रॅफिक कमी करणार नाही, तर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देऊन टोल प्रणालीला अधिक पारदर्शक आणि जलद करेल. मात्र, जर तुम्ही हे नियम समजून घेण्यात निष्काळजीपणा दाखवला, तर तुम्हाला टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावं लागू शकतं.
FASTag न चालल्यास भरावा लागेल जास्त टोल
रस्ते वाहतूक मंत्रालयानं हायवे फी २००८ मध्ये निश्चित केलेल्या संरचनेनुसार सुधारणा केली आहे. यानुसार, जर एखाद्या चालकाने FASTag लेनमध्ये प्रवेश केला परंतु त्याचा FASTag स्कॅन झाला नाही किंवा वाहनावर FASTag लावलेलाच नसेल, तर त्याला आता पूर्वीसारखा एकसमान चार्ज लागणार नाही. उलट, पेमेंटच्या पद्धतीनुसार त्याला वेगवेगळं शुल्क भरावं लागेल.
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
कॅशमध्ये दुप्पट, डिजिटल पेमेंटमध्ये फक्त १.२५ पट शुल्क
नवीन व्यवस्थेनुसार, FASTag फेल झाल्यास जर चालकानं कॅशमध्ये पैसे भरले, तर त्याला सामान्य टोलच्या दुपटीनं शुल्क भरावे लागेल. परंतु याच परिस्थितीत जर चालकानं UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे पेमेंट केलं, तर त्याच्याकडून फक्त १.२५ पट टोल शुल्क आकारलं जाईल. उदाहरण पाहायचं झाल्यास तुमचा सामान्य टोल ₹१०० आहे. तो FASTag द्वारे भरल्यास तुम्हाला ₹ १०० च भरावे लागतील. परंतु FASTag फेल झाल्यावर कॅश पेमेंट केलं तर ₹ २०० (दुप्पट) आणि FASTag फेल झाल्यावर UPI/डिजिटल पेमेंट केल्यास तुम्हाला ₹ १२५ (१.२५ पट) टोल भरावा लागेल.
लांब रांगांतून मिळणार दिलासा
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिल्यामुळे टोल प्लाझावर लागणाऱ्या लांब रांगा कमी होतील, असं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे वाहनांचा वेग वाढेल, वेळेची बचत होईल आणि संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक होईल. रोखीचे व्यवहार कमी झाल्यामुळे मानवी चुकाही कमी होतील आणि डिजिटल इंडिया मिशनला बळकटी मिळेल. यापूर्वी अनेकदा ड्रायव्हर्सच्या FASTag मध्ये तांत्रिक बिघाड, एक्स्पायर होणं किंवा रीडरच्या समस्येमुळे स्कॅन होत नव्हता. अशा वेळी त्यांना नाइलाजानं दुप्पट टोल भरावा लागत होता. पण नवीन नियमांमुळे, डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडल्यास या भारातून दिलासा मिळेल आणि ते फक्त १.२५ पट टोल भरून पुढे जाऊ शकतील.
