लंडन/वॉशिंग्टन: जगातील आघाडीची अन्न उत्पादक कंपनी 'नेस्ले' सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे. कंपनीने आपल्या 'इन्फंट न्यूट्रिशन' (लहान मुलांचे दूध आणि आहार) उत्पादनांच्या काही बॅचेस तब्बल २५ देशांमधून परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादनांमध्ये 'सेरुलॉइड' नावाचे घातक विषारी घटक आढळल्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका कच्च्या मालामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दूषित घटक मिसळले असण्याची शक्यता आहे. या विषारी घटकामुळे लहान मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटाचे विकार होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे विषारी घटक उष्णतारोधक असल्याने उकळत्या पाण्यानेही नष्ट होत नाहीत, असे ब्रिटनच्या 'फूड स्टँडर्ड्स एजन्सी'ने (FSA) स्पष्ट केले आहे.
कोणती उत्पादने आहेत रडारवर?
या महा-रिकॉलमध्ये नेस्लेचे SMA, BEBA आणि NAN हे लोकप्रिय ब्रँड्स समाविष्ट आहेत. युरोपातील जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन यांसह अर्जेंटिना आणि तुर्की यांसारख्या २५ देशांमधील विक्रीवर याचा परिणाम झाला आहे. नेस्लेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिकॉल असल्याचे मानले जात आहे.
नेस्लेचे पालकांना आवाहन
कंपनीने स्पष्ट केले आहे की, अद्याप कोणत्याही बालकाला या आहारामुळे बाधा झाल्याचे वृत्त नाही. तरीही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालकांनी उत्पादनाच्या डब्यावरील 'बॅच कोड' तपासावा आणि जर तो रिकॉल केलेल्या यादीत असेल, तर मुलांना ते अन्न देऊ नये. बाधित उत्पादने परत करून ग्राहकांना पूर्ण पैसे परत दिले जातील, असेही कंपनीने नमूद केले आहे.
