China 9-9-6 Working Formula :इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी २ वर्षांपूर्वी भारतीय तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याबद्दल विधान केले होते. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले असून, यासाठी शेजारील देश चीनचे उदाहरण दिले आहे. मूर्ती यांनी नुकत्याच एका मुलाखतीत चीनच्या कार्यसंस्कृतीतील '९-९-६ मॉडेल'चा उल्लेख केला आहे. भारताच्या विकासाची गती वाढवण्यासाठी तरुणांना जास्त तास काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
चीनचे '९-९-६' मॉडेल काय आहे?
चीनमधील अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये '९-९-६ वर्क रूल' खूप सामान्य असल्याचे मूर्ती यांनी सांगितले. या नियमानुसार, कर्मचाऱ्यांकडून सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत, आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची अपेक्षा ठेवली जाते. याचा अर्थ एकूण आठवड्याला सुमारे ७२ तास काम करणे आहे. हे मॉडेल अलीबाबा आणि हुआवेई सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये लोकप्रिय होते. मात्र, 'वर्क-लाइफ बॅलन्स' बिघडल्यामुळे आणि वाढत्या तणावामुळे यावर जोरदार टीका झाली. परिणामी, २०२१ मध्ये चीनच्या सुप्रीम कोर्टाने हे '९-९-६ मॉडेल' अवैध ठरवले. परंतु, काही ठिकाणी ते आजही लागू असल्याचे बोलले जाते.
वाचा - अलख पांडे यांच्या 'फिजिक्सवाला'चा शेअर बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदारांना ३३% प्रीमियमचा फायदा
नारायण मूर्ती यांचा पुन्हा तरुणांना सल्ला
एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण मूर्ती यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के आहे, जो चांगला आहे. पण चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा जवळपास सहा पटीने मोठी आहे. ही गती पकडण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग आणि योगदान आवश्यक आहे. मूर्ती यांनी तरुणांना आवाहन केले की, 'वर्क-लाइफ बॅलन्स'ची चिंता करण्याऐवजी त्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या करिअरवर आणि उत्पादकतेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यापूर्वी २०२३ मध्येही त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी ७० तास काम करण्याचं समर्थन केलं होतं.
