Mutual Funds vs FD : सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात अल्पमुदत ते दीर्घकालीन गुंतवणूक अशा विविध पर्यायांचा समावेश आहे. गुंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईपेक्षा जास्त असेल तरच गुंतवणुकीत अर्थ आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड डिपॉझिट यापैकी कुठे गुंतवणूक करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला आहे? तुमचे आर्थिक उद्दिष्ट कोण पूर्ण करू शकेल? चला तुमच्या सर्व शंकाचे निरसन करू.
जर तुम्ही कमीत कमी जोखीम घेऊन खात्रीशीर परतावा शोधत असेल, तर एफडी हा एक सोपा पर्याय असू शकतो. परंतु, जर तुम्हाला कालांतराने जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा असेल आणि थोडा जास्त धोका पत्करण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
म्युच्युअल फंड कसे काम करते?
म्युच्युअल फंड म्हणजे अशी गुंतवणूक ज्यामध्ये अनेक लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि तज्ञांकडून तुमच्या वतीने ते पुन्हा गुंतवले जातात. हे फंड इक्विटी, बाँड किंवा या दोन्ही पर्यायांच्या संयोजनात गुंतवले जाऊ शकतात, म्हणजेच फंडाच्या प्रकारानुसार, जोखीम आणि संबंधित परतावा वेगवेगळा असेल. तुम्ही अशा इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करता ज्यात इतर प्रकारांपेक्षा जास्त परतावा मिळण्याची क्षमता असते. यात जोखीम असते कारण त्याचे मूल्य शेअर बाजाराच्या कामगिरीतील चढउतारांवर अवलंबून असते. दुसरीकडे, डेट फंड तुलनेने स्थिर असतात आणि कमीत कमी जोखीम घेऊन कमी परतावा देतात.
म्युच्युअल फंडाच्या तुलनेत एफडीमधील परतावा
जर तुमची जोखीम घेण्याची क्षमत नसेल आणि तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करुन निश्चित परतावा हवा असेल तर बचत ठेव तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यात तुम्ही फिक्स व्याजदराच्या बदल्यात एका निश्चित कालावधीसाठी एकरकमी रक्कम गुंतवता. यात जोखीम जवळजवळ शून्य असली तरी, परतावा सहसा म्युच्युअल फंडांपेक्षा खूपच कमी असतो. जर एखाद्याला सुरक्षितता आणि अंदाज लक्षात घेऊन गुंतवणूक करायची असेल तर ते बरोबर असू शकतात. तसेच, भारतात ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवला जातो, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित असल्याची तुम्हाला पूर्णपणे खात्री असू होते.
कोणत्या गुंतवणुकीत जोखीम अधिक?
म्युच्युअल फंडांमध्ये, विशेषतः इक्विटी फंडांमध्ये, दीर्घकाळात उत्तम परतावा देण्याची क्षमता असते. पण, बाजारातील चढउतार तुमच्या बाजूने असोत किंवा नसोत, ते हाताळण्यासाठी तुम्हाला तयार असले पाहिजे. याउलट, एफडीवरील परतावा मोठ्या प्रमाणात निश्चित असतो. तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी तुमच्याकडे किती पैसे असतील हे तुम्हाला नक्की माहिती आहे. जर तुम्हाला खात्रीची आवड असेल तर एफडी तुम्हाला शांत झोप देईल.
प्राप्तीकरात सूट मिळते का?
म्युच्युअल फंड थोडे अधिक कर-कार्यक्षम असतात. म्हणजे तुम्ही ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम) सारख्या कर बचत पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80C अंतर्गत वजावटीची परवानगी मिळतात. पण, जर तुमची गुंतवणूक डेट फंडमध्ये असेल, तर सूट मिळत नाही. दुसरीकडे बचत ठेवीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे, जे तुमच्या परताव्यावर परिणाम करू शकते.
वाचा - शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)