CNG Shortage in Mumbai : प्रत्येक मिनिटाची किंमत असलेल्या मुंबईसारख्या शहरात सोमवारी सकाळी अचानक सीएनजी पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, बंद पडलेले सीएनजी पंप आणि त्यामुळे वाढलेले ऑटो-टॅक्सीचे भाडे यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली. कामावर जाणारे लोक आणि शालेय विद्यार्थी या सर्वांनाच या अचानक उद्भवलेल्या संकटाचा फटका बसला.
सीएनजी पुरवठा का थांबला?
महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, वडाळा येथील सिटी गेट स्टेशन वर गॅसचा पुरवठा थांबल्यामुळे संपूर्ण पाईपलाईन नेटवर्कवर परिणाम झाला. याचा थेट परिणाम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर झाला. कमी दाबामुळे अनेक पंप बंद ठेवण्यात आले. मुंबई महानगर क्षेत्रात एकूण ३९८ सीएनजी पंप आहेत, त्यापैकी १५२ मुंबई शहरात आहेत. यापैकी अनेक पंपांवर इंधन भरण्याची गती कमी झाली, तर काही तात्पुरते बंद ठेवण्यात आले. सीएनजी न मिळाल्याने ऑटो आणि टॅक्सी चालकांना तासोनतास रांगेत उभे राहावे लागले. याचा फायदा घेत अनेक चालकांनी वाढीव भाड्याची मागणी केली, ज्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
दुरुस्ती कधी पूर्ण होणार?
एमजीएलने या घटनेबद्दल एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, सध्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे आणि १८ नोव्हेंबर २०२५, दुपारपर्यंत पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. GAIL च्या मुख्य गॅस पाईपलाईनला ट्रॉम्बे येथील RCF परिसरात नुकसान पोहोचल्यामुळे वडाळ्यातील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवर गॅसचा पुरवठा खंडित झाला. दिलासादायक बाब म्हणजे, घरोघरी दिला जाणारा पीएनजी गॅसचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहे. पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण होताच आणि वडाळा सीजीएस स्टेशनवर गॅसचा पुरवठा सुरू होताच, संपूर्ण नेटवर्कवरील परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती एमजीएलने दिली आहे.
वाचा - '७० तास काम करा' या मतावर नारायण मूर्ती ठाम! आता चीनच्या '९-९-६' मॉडेलचं दिलं उदाहरण, म्हणाले...
बेस्ट बसेस थांबल्या नाहीत!
सीएनजी पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक मुंबईकरांना बेस्टच्या बसेसवरही परिणाम होईल अशी भीती वाटत होती. मात्र, बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उटाले यांनी ही भीती निराधार असल्याचे स्पष्ट केले. बेस्टच्या ताफ्यात १,२५० सीएनजी बसेस असून, त्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. बेस्ट बसेसची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
