भारतीय शेअर बाजारात, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. मात्र असे असले तरीही, दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी एका पेनी स्टॉकवर मोठा डाव लावला आहे. त्यांनी २० रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या शेअरमध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीने दलाल स्ट्रीटचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुकुल अग्रवाल यांनी खरेदी केले ४,४०,१९,९२१ शेअर्स -
मुकुल अग्रवाल यांनी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (HCC) चे सुमारे ४,४०,१९,९२१ शेअर्स खरेदी केले आहेत. जे कंपनीतील अंदाजे १.६८% एवढ्या हिस्सेदारी एवढे आहेत. महत्वाचे म्हणजे, बाजारात अनिश्चितता असतानाही कंपनीकडे १३,१५२ कोटी रुपयांची भरभक्कम 'ऑर्डर' आहे. यावरून, कंपनीकडे कामाची कसल्याही प्रकारची कमतरता नसणार, हे स्पष्ट होते. या बातमीनंतर आज कंपनीचा शेअर २ टक्क्यांनी वधारून १८.४४ रुपयांवर पोहोचला आहे.
जवळपास १०० वर्षांचा अभियांत्रिकी अनुभव असलेली HCC ही भारतातील एक प्रतिष्ठित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. देशातील २६% जलविद्युत (Hydro Power) आणि ६०% अणुऊर्जा (Nuclear Power) प्रकल्पांच्या उभारणीत कंपनीचे योगदान आहे.
५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून १२% ने वधारला शेअर -
याशिवाय, हजारो किलोमीटरचे महामार्ग, बोगदे आणि शेकडो पुलांची निर्मितीही कंपनीने केली आहे. सध्या वाहतूक, ऊर्जा आणि पाणी पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत कंपनी कार्यरत आहे. सुमारे ४,७८५ कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या HCC ने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या ३ वर्षांत १६०% चा मल्टिबॅगर परतावा दिला आहे. हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून १२% ने वधारला आहे.
मुकुल अग्रवाल यांची ही गुंतवणूक कंपनीच्या दीर्घकालीन प्रगतीवर विश्वास दर्शवणारी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारचा वाढता खर्च पाहता, हा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांच्या रडारवर राहण्याची शक्यता आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
