Mukesh Ambani Campa Sure: कोला क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स आता पाण्याच्या व्यवसायातही मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपल्या नवीन आणि स्वस्त पाण्याचा ब्रँड 'कॅम्पा श्युअर'साठी अनेक प्रादेशिक पाणी उत्पादक कंपन्यांशी भागीदारी करण्याची योजना आखत आहे. हे पाऊल ३०,००० कोटी रुपयांच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि विखुरलेल्या पॅकेज्ड ड्रिकिंग मार्केटमध्ये खळबळ माजवू शकतं.
इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी अत्यंत आक्रमकपणे किमती निश्चित करत आहे. रिलायन्स समूहाच्या एफएमसीजी (FMCG) शाखेचे रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. "आम्ही बॉटलिंगसाठी आणि लहान ब्रँड्ससाठी प्रशासन मानके सुनिश्चित करण्यासाठी अनेक प्रादेशिक पॅकेज्ड पाणी कंपन्यांशी सहकार्य करण्याची आणि भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत आहोत," असं ते म्हणाले. या भागीदारी बॉटलिंग, तंत्रज्ञान आणि संभाव्य ब्रँडिंग सहकार्यावर आधारित असतील. कंपनी आपल्या भागीदारांना विकत घेण्याची कोणतीही योजना आखत नाही, असंही ते म्हणाले.
किंमतीत मोठ्या कंपन्यांना टक्कर
'कॅम्पा श्युअर' ५ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आलं आहे. ही किंमत २५० मिलीलीटरच्या बाटलीसाठी आहे. येत्या दोन आठवड्यांत ते सर्वप्रथम उत्तर भारतातील बाजारात उतरवलं जाईल, अशी अपेक्षा आहे.
कॅम्पा श्युअरचे मोठे पॅक सध्याच्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत २० ते ३०% स्वस्त आहेत. उदाहरणार्थ, एक लीटर कॅम्पा श्युअरची बाटली १५ रुपयांना विकली जात आहे. तर, बाजारपेठेतील मोठे खेळाडू जसे की बिसलेरी, कोका-कोलाची किनले आणि पेप्सिकोची अक्वाफिना त्यांची एक लीटरची बाटली २० रुपयांना विकतात. कॅम्पा श्युअरच्या दोन लीटरच्या पॅकची किंमत २५ रुपये आहे. तर, प्रतिस्पर्धी कंपन्यांचे दोन लीटरचे पॅक ३० ते ३५ रुपयांना मिळतात.
आता मार्केटिंगवर भर
उद्योग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, बिसलेरी, कोका-कोला आणि पेप्सिको त्यांची बाजारपेठेतील हिस्सा कायम ठेवण्यासाठी पाण्याच्या ब्रँडिंग आणि ग्राहक प्रचार मोहिमा वाढवण्याची योजना आखत आहेत. या तिन्ही कंपन्यांपैकी, कोका-कोला आणि पेप्सिकोने आतापर्यंत त्यांच्या पाण्याच्या ब्रँड्सच्या मार्केटिंग आणि जाहिरातींवर खूपच कमी खर्च केला होता.
कोला क्षेत्रातही दमदार एन्ट्री
रिलायन्सनं कोला क्षेत्रातही दमदार प्रवेश केला होता. किमतीच्या बाबतीत कंपनीने कोका-कोला आणि पेप्सिकोला मोठं आव्हान दिलं आहे. कंपनी तीच रणनीती पाण्याच्या व्यवसायातही वापरत आहे. रिलायन्सचं कॅम्पा सॉफ्ट ड्रिंक्स २०० मिलीलीटरच्या बाटलीसाठी १० रुपयांमध्ये आणण्यात आलं होतं. यामुळे पेप्सिको आणि कोका-कोलाला त्यांचे दर कमी करण्यास किंवा लहान कॅन आणि बाटल्या कमी किमतीत लाँच करण्यास भाग पाडलं.