Ambani-Facebook Deal: भारतीय उद्योगजगतात एक ऐतिहासिक भागीदारी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मेटा (Facebook) ची सहाय्यक कंपनी Facebook Overseas Inc. सोबत मिळून एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. या नव्या कंपनीचे नाव रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड (REIL) आहे.
या संयुक्त कंपनीमध्ये रिलायन्सचा 70% आणि मेटाचा 30% हिस्सा असेल. या प्रकल्पासाठी एकूण ₹855 कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करण्यात येणार असून, त्यात बहुतांश रक्कम रिलायन्स गुंतवेल, तर मेटा 30% गुंतवणूक करणार आहे.
RIL ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर 2025 रोजी रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने या नव्या कंपनीचा औपचारिक पायाभरणी केली. या प्रक्रियेसाठी सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता पडली नाही, त्यामुळे कंपनीची स्थापना जलदगतीने पूर्ण झाली.
REIL चा उद्देश
या नव्या कंपनीचे प्रमुख ध्येय मोठ्या उद्योगांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान विकसित करणे आहे. REIL डेटा अॅनालिटिक्स आणि ऑटोमेशन, प्रेडिक्टिव मॉडेलिंग, स्मार्ट डिसीजन सपोर्ट सिस्टिम्स, AI आधारित बिझनेस इनसाइट्स आणि ऑटोमेटेड वर्कफ्लो क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स-मेटा भागीदारी भारतीय उद्योगांना जागतिक दर्जाची AI तंत्रज्ञान सेवा उपलब्ध करून देईल आणि भारतातील एंटरप्राइज सेक्टरमध्ये नवी क्रांती घडवू शकते.
रिलायन्सचा डिजिटल विस्ताराचा पुढचा टप्पा
रिलायन्सने गेल्या काही वर्षांत टेलिकॉम, रिटेल आणि डिजिटल सेवा क्षेत्रात झपाट्याने वाढ केली आहे. जिओच्या माध्यमातून भारतात डेटा आणि इंटरनेट क्रांती घडवून आणल्यानंतर, आता कंपनीचा फोकस AI आणि क्लाउड कम्प्यूटिंगवर आहे. मेटासोबतचा हा संयुक्त उपक्रम रिलायन्सला जागतिक AI इकोसिस्टममध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून देईल.
फेसबुक आणि रिलायन्सचे जुने नाते
फेसबुकने 2020 मध्ये रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये $5.7 अब्ज (₹43,574 कोटी) इतकी गुंतवणूक केली होती. त्यामुळे फेसबुकला Jio Platforms मध्ये 9.99% स्टेक मिळाला होता. ही भागीदारी भारतीय डिजिटल मार्केटमध्ये परदेशी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी ठरली होती. जिओचे 500 मिलियनहून अधिक ग्राहक हे या नव्या AI प्रकल्पासाठीही मोठा डेटा बेस ठरू शकतात. त्यामुळेच आता या नवीन क्षेत्रात दोन्ही दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत.
