Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडनं ४५ वर्षे जुना ब्रँड विकत घेतलाय. या ब्रँडचं नाव वेलवेट असं आहे, ही कंपनी तामिळनाडू स्थित आहे. रिलायन्स रिटेलनं एफएमसीजी उत्पादनांची उत्पादक कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या माध्यमातून हे अधिग्रहण केलंय. या अधिग्रहणामुळे पर्सनल केअर सेगमेंटमध्ये रिलायन्स कन्झ्युमरची उपस्थिती मजबूत झाली आहे.
कंपनीचे सीईओ काय म्हणाले?
कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) केतन मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिग्रहण करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे लक्ष्य वेलवेट ब्रँडच्या शॅम्पूचे पुनरुज्जीवन करण्याचं आहे. लवकरच पर्सनल केअर सेगमेंटमध्ये विविध प्रकारची उत्पादनं सादर केली जाणार आहेत. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचं स्वप्न भारतीय हेरिटेज ब्रँड विकत घेण्याचं आहे. आम्ही कॅम्पा आणि नंतर रावळगाव शुगर (पान पासंद आणि कॉफी ब्रेकचे प्रवर्तक) विकत घेतलं. वेलवेट विकत घेताना आम्हाला आनंद होत आहे. ब्रँडचे (वेलवेट) पुनरुज्जीवन करण्याचा आपला हेतू असल्याचं त्यांनी नमूद केलं.
काय आहेत डीलचे डिटेल्स
हा धोरणात्मक करार रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला वेलवेटला कायमचा परवाना मिळवून देणार आहे. सुरुवातीला रिलायन्स कन्झ्युमर वेलवेट ब्रँडअंतर्गत तामिळनाडूमध्ये शॅम्पूची श्रेणी लाँच करेल आणि नंतर इतर बाजारपेठांमध्ये विस्तार त्याचा करेल. कंपनी सुरुवातीला शॅम्पू तयार करेल आणि नंतर वेलवेट ब्रँडअंतर्गत साबण आणि इतर उत्पादनं आणणार असल्याचं केतन मोदी म्हणाले.
१९८० मध्ये सुरुवात
सुजाता बायोटेकचे संस्थापक सीके राजकुमार यांनी १९८० मध्ये वेलवेट लाँच केले होते. वडील आर. चिन्नीकृष्णन यांच्या दृष्टीकोनातून प्रेरित होऊन राजकुमार यांनी पीव्हीसी पिलो पाऊचमध्ये शॅम्पू पॅकेजिंगची संकल्पना मांडली. त्यांच्या कल्पकतेनं एफएमसीजी उद्योगाचा कायापालट झाला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, वेलवेटनं व्होल्टासबरोबर मार्केटिंग करार केला. नंतर राजकुमार यांनी मार्केटिंग आणि वितरणासाठी गोदरेज समूहाशी भागीदारी केली आणि वेलवेटला प्रादेशिक ब्रँडमधून राष्ट्रीय स्तरावर नेलं.