भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) रिलायन्सचे संपूर्ण मालकी हक्क असलेल्या एका नव्या कंपनीची घोषणा केली आहे. या उपकंपनीचे नाव 'रिलायन्स इंटेलिजन्स' असे असेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्वाच्या केंद्रस्थानी स्थापित करणे, या कंपनीचे लक्ष्य असेल.
मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स 'रिलायन्स इंटेलिजेन्स' ही उपकंपनी स्थापन करणार आहे. मला अभिमान आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधीच रिलायन्सचा डीप-टेक व्यवसाय बनण्याच्या मार्गावर आहे. या अजेंड्याला आणखी फोकस करण्यासाठी आणि गती देण्यासाठी, आज मला रिलायन्स इंटेलिजन्स नावाची एक नवी संपूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्याची घोषणा करताना अधिक आनंद होत आहे.
या गोष्टींवर असेल फोकस -
AI-Ready डेटा सेंटर -
मोठ्या प्रमाणावर (gigawatt-scale) एआय-रेडी डेटा सेंटर्स तयार करणे, जे ग्रीन एनर्जीवर चालेल. जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर AI प्रशिक्षण आणि अनुमान सक्षम होऊ शकेल. यासेटर्सचे काम आधीच गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू झाले आहे.
जागतिक भागीदारी -
रिलायन्स इंटेलिजन्स, जगातील आघाडीच्या टेक कंपन्या आणि ओपन-सोर्स समुदायांसोबत काम करेल. याचा उद्देश एआय सिस्टिममध्ये विश्वसनियता, भारतीय मानके आणि मजबूत पुरवठा साखळी तयार करणे आहे.
AI सेवा -
रिलायन्स इंटेलिजेंसच्या नवीन युनिटचे उद्दिष्ट सामान्य जनता, लहान व्यवसाय आणि मोठ्या उद्योगांना, सोप्या आणि विश्वासार्ह एआय-सक्षम सेवा प्रदान करणे तसेच शिक्षण आणि शेतीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी विशेष एआय-आधारित समाधान तयार करणे आहे.