Share Market Top 5 Stocks : आर्थिक सल्लागार आणि ब्रोकरेज फर्म्सकडून नेहमीच काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या आठवड्यासाठी ५ असे शेअर्स निवडले आहेत, ज्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि भविष्यातही त्यांच्याकडून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. चला, या ५ कंपन्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
१. बीईएल (BEL)
बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) ने नुकतेच पहिल्या तिमाहीत २५% वार्षिक वाढ नोंदवली आहे. कंपनीकडे सध्या ७४९ अब्ज रुपयांची विक्रमी ऑर्डर बुक आहे. संरक्षण क्षेत्रातील मोठी मागणी आणि निर्यातीमुळे भविष्यातही कंपनीची चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरसाठी ४९० रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
२. जेके लक्ष्मी सिमेंट (JK Lakshmi Cement)
सिमेंट क्षेत्रातील ही कंपनी यंदा चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा (PAT) ६३% नी वाढला आहे. कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत असून, लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा करत आहे. यामुळे आगामी काळात कंपनीची कामगिरी आणखी सुधारेल. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ११५० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
३. रेडिको खेतान (Radico Khaitan)
रेडिको खेतानने पहिल्या तिमाहीत ३२% महसूल वाढ नोंदवली आहे, ज्यात प्रीमियम दारूच्या ब्रँड्सचा मोठा वाटा आहे. यूके-भारत मुक्त व्यापार करारामुळे (FTA) स्कॉचवरील आयात शुल्क कमी झाले आहे, ज्यामुळे कंपनीला फायदा होत आहे. नवीन ब्रँड्स लाँच केल्यामुळे कंपनीची वाढ कायम राहील. या शेअरसाठी ३२५० रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
४. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)
महिंद्रा अँड महिंद्राने पहिल्या तिमाहीत चांगला नफा नोंदवला आहे, जो अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातून मागणी वाढत आहे आणि कंपनीने अनेक नवीन SUV तसेच ट्रॅक्टर लाँच केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या महसूलात वाढ अपेक्षित आहे. मोतीलाल ओसवाल यांनी ३६८७ रुपयांच्या लक्ष्यासह 'खरेदी' रेटिंग कायम ठेवली आहे.
५. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
बँकिंग क्षेत्रात आयसीआयसीआय बँकेने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत बँकेचा नफा १५.५% नी वाढला आहे. बँकेची कर्ज वितरण, ठेवी आणि एकूण आर्थिक व्यवस्थापन खूप मजबूत आहे. तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि वैयक्तिक कर्जांमुळे बँकेची पुढील वाटचाल सकारात्मक असेल. या शेअरसाठी १६७० रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वाचा - लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
(टीप - यामध्ये दिलेली माहिती तज्ज्ञांची आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)