Microsoft Investment In India: अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १.५८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. कंपनीची संपूर्ण आशियातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली.
भारतातील मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात असेल. मायक्रोसॉफ्टनं एका निवेदनात म्हटलंय की, कंपनी २०२६ ते २०२९ दरम्यान पुढील चार वर्षांमध्ये भारतात १७.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल, ज्यामुळे एआयला मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. कंपनीनं हे देखील स्पष्ट केलं की, "ही गुंतवणूक मायक्रोसॉफ्टने जानेवारी २०२५ मध्ये घोषित केलेल्या ३ अब्ज डॉलरच्या पूर्वीच्या वचनबद्धतेपेक्षा वेगळी आहे."
सत्या नडेला यांनी 'एक्स'वर दिली माहिती
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांनी पीएम मोदींसोबतच्या भेटीनंतर एक्सवर त्यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला. फोटो पोस्ट करताना सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या नवीन गुंतवणूक योजनेची माहिती दिली.
"भारताचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षांना समर्थन देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट १७.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची वचनबद्धता व्यक्त करत आहे. ही आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. यामुळे भारताच्या एआय भविष्यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल्स आणि सॉवरेन कॅपेबिलिटी तयार करता येतील," असं नडेला म्हणाले.
Thank you, PM @narendramodi ji, for an inspiring conversation on India’s AI opportunity. To support the country’s ambitions, Microsoft is committing US$17.5B—our largest investment ever in Asia—to help build the infrastructure, skills, and sovereign capabilities needed for… pic.twitter.com/NdFEpWzoyZ
— Satya Nadella (@satyanadella) December 9, 2025
पुढील वर्षी सुरू होणार इंडिया साउथ सेंट्रल क्लाउड रिजन
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टनं सांगितलं की, हैदराबादमध्ये असलेले त्यांचं 'इंडिया साउथ सेंट्रल क्लाउड रिजन' २०२६ च्या मध्यापर्यंत सुरू होईल, ज्याचा एकूण आकार अंदाजे दोन ईडन गार्डन्स स्टेडियम एवढा आहे. कंपनीनं भारतात एआय स्किल्सनं युक्त प्रतिभा विकसित करण्याचं आपलं लक्ष्य एक कोटीवरून दुप्पट करत २०३० पर्यंत दोन कोटी लोकांना एआय स्किल्स देण्याचा संकल्प केला आहे.
गूगल, डिजिटल कनेक्शनही मोठी गुंतवणूक करणार
मायक्रोसॉफ्टपूर्वी गुगलनं १४ ऑक्टोबरला पुढील ५ वर्षांत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतात एक एआय हब स्थापित करण्याची घोषणा केली होती, ज्यात अदानी समूहासोबत भागीदारीत देशातील सर्वात मोठं डाटा सेंटर देखील समाविष्ट असेल. यानंतर डिजिटल कनेक्शननंही ११ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली, जी ब्रुकफिल्ड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकेची डिजिटल रिअल्टी यांचा संयुक्त उपक्रम आहे.
