Mexico Tariff on India: अमेरिकेचा शेजारील देश मेक्सिकोनेभारत आणि आशियातील अनेक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावलं आहे. जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मेक्सिकोच्या सिनेटनं, ज्या देशांशी मेक्सिकोचा कोणताही मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) नाही, अशा देशांतून येणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये भारत, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांचा समावेश आहे. हे नवीन टॅरिफ धोरण १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. या धोरणांतर्गत काही वस्तूंवरील टॅरिफ ५०% पर्यंत वाढेल, तर बहुतांश वस्तूंवरील वाढ सुमारे ३५% पर्यंत मर्यादित राहील.
धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
टॅरिफ का लावला?
मेक्सिको सरकारने या निर्णयामागे आपल्या देशातील उद्योगांना वाचवणं आणि आर्थिक धोरण मजबूत करणं ही कारणं दिली आहेत. अध्यक्ष क्लाउडिया शिनबौम यांच्या सरकारचा तर्क आहे की, देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार वाचवण्यासाठी हा टॅरिफ आवश्यक आहे. ऑटो, टेक्स्टाईल, स्टील, प्लास्टिक, फूटवेअर आणि ग्राहक तसंच मध्यवर्ती वस्तूंच्या क्षेत्रात विदेशी मालामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या टॅरिफमुळे व्यापारातील असमतोल दूर होईल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे मेक्सिकन उत्पादकांना आशियाई देशांकडून येणाऱ्या मालाच्या तुलनेत चांगली संधी मिळेल.
आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास, मेक्सिको आपलं उत्पन्न वाढवू इच्छितो. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, या नवीन टॅरिफमुळे २०२६ मध्ये मेक्सिकन सरकारला सुमारे ३.७ अब्ज डॉलरचा अतिरिक्त महसूल मिळेल. हा पैसा सरकारचे वित्तीय नुकसान भरून काढण्यास मदत करेल.
मेक्सिकोसाठीही अडचणी
मेक्सिकोच्या या निर्णयावर टीकाही होत आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. उत्पादकांसाठी खर्च वाढू शकतो आणि इतर देशांशी व्यापार तणाव वाढू शकतो. टीकाकारांचं मत आहे की, मेक्सिकोला कच्च्या मालाचा खर्च वाढवावा लागू शकतो आणि महागाई वाढू शकते, कारण देशांतर्गत उत्पादकांना नवीन स्रोतांकडून वस्तू मागवाव्या लागतील.
ट्रम्प यांच्या दबावाखाली उचललेले पाऊल?
रणनीतिक दृष्ट्या पाहिल्यास, मेक्सिकोच्या या निर्णयात एक मजबूत भू-राजकीय पैलू आहे. मेक्सिकोचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका आहे. लॅटिन अमेरिकेतील देशांवर चीनसोबतचे आर्थिक संबंध मर्यादित ठेवण्यासाठी अमेरिका दबाव आणत असतानाच हा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय आला आहे. काही विश्लेषकांचं मत आहे की, मेक्सिकोचे हे पाऊल अमेरिकेला खूश करण्यासाठी उचलले गेले आहे, विशेषतः युनायटेड स्टेट्स-मेक्सिको-कॅनडा कराराच्या (USMCA) पुढील पुनरावलोकनापूर्वी हे पाऊल उचलण्यात आलंय. अमेरिकेसोबत वाढलेला व्यापार तणाव आणि मेक्सिकोवर टॅरिफ लावण्याच्या अमेरिकेच्या संभाव्य धमक्या कमी करण्याचा हा एक मार्ग असू शकतो.
अमेरिका आधीच मेक्सिकोवर २५% टॅरिफ लावत आहे. ट्रम्प वारंवार वेगवेगळ्या कारणांमुळे मेक्सिकोवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प यांची इच्छा आहे की आशियाई वस्तूंचा अमेरिकेत प्रवेश बंद व्हावा, कारण त्यांचा विश्वास आहे की हा माल मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहोचत आहे. त्यामुळे, मेक्सिकोचं हे पाऊल ट्रम्प यांना संतुष्ट करण्यासाठी असू शकते.
