Meta Layoffs: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी 'मेटा' (Meta) मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या कपातीची तयारी सुरू आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, अमेरिकन टेक दिग्गज कंपनी मेटा आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २०% म्हणजेच सुमारे १६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढवण्यासोबतच परिचालन कार्यक्षमता वाढवू इच्छित आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
७९,००० पैकी २०% नोकऱ्या जाण्याची भीती
रॉयटर्सच्या अहवालानुसार, कंपनीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत चर्चेत एकूण कर्मचाऱ्यांच्या २० टक्के किंवा त्याहून अधिक कपातीचा विचार करण्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मेटाकडे सुमारे ७९,००० कर्मचारी होते, त्या आधारावर ही कपात केल्यास जवळपास १६,००० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असेल.
सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम; पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर
कंपनीनं वृत्ताला म्हटलं 'अफवा'
मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी मात्र हा अहवाल फेटाळून लावत याला 'केवळ संभाव्य धोरणांवर आधारित अटकळ' म्हटलं आहे. अहवालानुसार, कर्मचारी कपातीचे प्रमाण किंवा वेळेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
कार्यक्षमता वाढवण्यावर भर
अहवालात असंही म्हटलंय की, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर प्रमुखांना संभाव्य कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. तसेच, आपली टीम अधिक कार्यक्षमतेनं कशी काम करू शकेल, याचं मूल्यांकन करण्यास सांगितलं आहे.
