जगभरातील शेअर बाजारांमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. याचा परिणाम जगभरातील टॉप १० श्रीमंतांपैकी ७ जणांच्या संपत्तीवरही झाला. यांपैकी सर्वाधिक नुकसान झाले ते मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे. मेटाचे शेअर्स तब्बल ११ टक्क्यांहून अधिक घसरल्याने, झुकरबर्ग यांच्या संपत्तीत २९.२ अब्ज डॉलर अर्थात सुमारे ₹25,88,50,70,00,000 एवढी घट झाली. यामुळे त्यांची संपत्ती आता २३५ अब्ज डॉलरवर आली आहे. महत्वाचे म्हणजे, श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांची संपत्तीही १५.३ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. आता त्यांची संपत्ती ४५७ अब्ज डॉलरवर आली आहे. याशिवाय ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांनाही १९.८ अब्ज डॉलरचा फटका बसला आसून, ३१७ अब्ज डॉलरसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याच बरोबर जेफ बेजोस यांनाही ६.६ अब्ज डॉलरचा फटका बसला. त्यांची संपत्ती साधारणपणे २४६ अब्ज एवढी आहे. यातच लॅरी पेज यांना ५.३१ अब्ज डॉलरचा फायदा झाला. ते २४४ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
दरम्यान भारतातीय उद्योगपती मुकेश अंबानी (१०४ अब्ज) यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलरने, गौतम अदानी (९२.७ अब्ज) यांची संपत्ती २१.२ कोटी डॉलरने कमी झाली.
जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत, सर्गेई ब्रिन (२२८ अब्ज) सहाव्या क्रमांकावर, बर्नार्ड अरनॉल्ट (१९४ अब्ज) सातव्या क्रमांकावर, स्टीव्ह बाल्मर (१८१ अब्ज) आठव्या स्थानावर, जेन्सन हुआंग (१७६ अब्ज) नवव्या स्थानावर तर मायकेल डेल (१६५ अब्ज) दहाव्या क्रमांकावर आहेत.
