Meesho Stock Upper Circuit: नुकतीच शेअर बाजारात लिस्ट झालेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या (Meesho) शेअर्समध्ये जोरदार तेजीचं सत्र सुरू आहे. बुधवारी कंपनीचा शेअर २० टक्क्यांच्या अपर सर्किटसह ₹२१६.३५ वर पोहोचला. जागतिक ब्रोकरेज फर्म 'UBS' नं या स्टॉकवर 'बाय' रेटिंगसह कव्हरेज सुरू केलं असून, कंपनीच्या भविष्यातील प्रगतीबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या तेजीसह मीशोचे शेअर्स आपल्या ₹१११ च्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ९५ टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप देखील सुमारे ९८,००० कोटी रुपयांवर पोहोचलेत.
UBS कडून ₹२२० चं टार्गेट
UBS नं मीशोसाठी ₹२२० ची टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, मीशोचं बिझनेस मॉडेल अत्यंत हलकं असून यात खेळत्या भांडवलाची गरज कमी लागते. इतर इंटरनेट कंपन्यांच्या तुलनेत मीशो सातत्यानं पॉझिटिव्ह कॅश फ्लो निर्माण करत आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०३० दरम्यान कंपनीच्या नेट मर्चेंडाइज व्हॅल्यूमध्ये (NMV) वार्षिक ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, २०३० पर्यंत ॲडजस्टेड एबिटा (EBITDA) मार्जिन ३.२ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित
UBS नुसार, वार्षिक व्यवहार करणाऱ्या युजर्सची संख्या १९९ मिलियनवरुन ५१८ मिलियनपर्यंत वाढल्यामुळे NMV मध्ये मोठी वाढ होईल. तसंच, ऑर्डर देण्याची वार्षिक फ्रिक्वेन्सी ९.२ वरून १४.७ वर जाण्याची शक्यता आहे. लॉजिस्टिक्समधील बचतीचा फायदा संपूर्ण इकोसिस्टमला देण्यासाठी कंपनी सरासरी ऑर्डर व्हॅल्यू ₹२७४ वरून ₹२३३ पर्यंत कमी करू शकते.
मीशोचा आयपीओ १० डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला होता. पहिल्याच दिवशी हा स्टॉक इश्यू प्राइसच्या तुलनेत ५३ टक्के प्रीमियमवर बंद झाला होता. गेल्या काही दिवसांतील चढ-उतारानंतर, बाजार दबावात असतानाही मीशोमध्ये तेजी कायम आहे.
को-फाउंडर विदित आत्रेय बनले 'बिलिनेयर'
मीशोच्या शेअर्समधील या तुफानी तेजीमुळे कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विदित आत्रेय आता अधिकृतपणे अब्जाधीशांच्या (Billionaire) क्लबमध्ये सामील झाले आहेत. कंपनीमध्ये त्यांचा ११.१ टक्के हिस्सा (४७.२५ कोटी शेअर्स) आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार त्यांच्या हिस्स्याचं मूल्य ₹९,१४२.८७ कोटी (सुमारे १.००५ अब्ज डॉलर्स) इतकं झालं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
