Meesho IPO : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'मीशो'वरुन तुम्हीही कपडे खरेदी करता का? आतापर्यंत तुम्ही फक्त पैसे खर्च केले असतील. मात्र, आता पैसे कमावण्याची संधी 'मीशो'मुळे निर्माण झाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो आता शेअर बाजारात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सॉफ्टबँक समर्थित असलेल्या या कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ लवकरच दाखल होत आहे. मीशोचा हा पब्लिक इश्यू ३ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार ५ डिसेंबर २०२५ पर्यंत यात बोली लावू शकतील. हा २०२५ मधील सर्वात चर्चेत असलेल्या आणि मोठ्या पब्लिक इश्यूजपैकी एक आहे.
आयपीओचे तपशील आणि किंमत
'मीशो'च्या आयपीओचा एकूण आकार ५,४२१.०५ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये ४,२५० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि १०.५५ कोटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्राइस बँड प्रति शेअर १०५ ते १११ निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये १३५ शेअर्ससाठी बोली लावावी लागेल.
महत्त्वाच्या तारखा
- ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी: २ डिसेंबर (इश्यू उघडण्यापूर्वी एक दिवस).
- सबस्क्रिप्शनसाठी खुले: ३ डिसेंबर २०२५
- बंद होण्याची तारीख: ५ डिसेंबर २०२५
- शेअर वाटप : सोमवार, ८ डिसेंबर
- रिफंड प्रक्रिया: मंगळवार, ९ डिसेंबर (याच दिवशी शेअर्स डीमॅट खात्यात जमा होतील).
- लिस्टिंग : बुधवार, १० डिसेंबर (BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची शक्यता).
कोणासाठी किती हिस्सा आरक्षित?
मीशोच्या पब्लिक इश्यूच्या एकूण आकारात खालीलप्रमाणे हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे.
- पात्र संस्थात्मक खरेदीदार : किमान ७५%
- बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार : १५% पर्यंत
- रिटेल गुंतवणूकदार : १०% पर्यंत
- या इश्यूचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, ॲक्सिस कॅपिटल आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया यांसारख्या मोठ्या संस्था करणार आहेत.
मजबूत लिस्टिंगचे संकेत
मीशोच्या आयपीओची गुंतवणूकदारांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती, याचा थेट परिणाम ग्रे मार्केट प्रीमियममध्ये दिसत आहे. बाजार तज्ज्ञांनुसार, मीशोचे अनलिस्टेड शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये १४४ रुपये प्रति शेअर प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. आयपीओचा अप्पर प्राइस बँड १११ रुपये असल्याने, जीएमपी जवळपास ३०% आहे. हा मजबूत जीएमपी शेअर बाजारात मीशोची दमदार लिस्टिंग होण्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
वाचा - 'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
