MDH-Everest Banned: भारतीय मसाले जगभरात लोकप्रिय आहेत. अगदी जुन्या काळापासून, आतापर्यंत जगभरात भारतातून मोठ्या प्रमाणावर मसाल्यांची निर्यात केली जाते. पण, गेल्या महिन्यात भारतीय मसाल्यांबाबत एक नवा वाद सुरू झाला आहे. यामुळेच देशातील लोकप्रिय MDH आणि Everest मसाल्यांवर सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळमध्येही विक्री, आयात आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, या दोन कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये रासायनिक इथिलीन ऑक्साईड असल्याच्या संशयावरुन नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या अन्न आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांमध्ये या रसायनांची चाचणी सुरू केली आहे. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नावाचे कीटकनाशक आढळून आल्यानंतर सरकारने हे बंदीचे उचलले आहे. सध्या तपास अहवाल येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
या देशांनीही तपास सुरू केला
MDH आणि Everest भारत, ब्रिटन, न्यूझीलंड, अमेरिका आणि मध्य पूर्वेसह जगातील अनेक देशांमध्ये विकले जातात. बुधवारी, न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा नियामकाने भारतीय मसाल्यांच्या ब्रँडच्या विविध उत्पादनांची तपासणी सुरू केल्याची माहिती दिली. याशिवाय, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या अन्न सुरक्षा नियामकांनीही या दोन ब्रँडच्या मसाल्यांची चौकशी आणि तपासणी सुरू केली आहे.
FSSAI ची कारवाई
या दोन्ही कंपन्यांना इतर देशांसह देशांतर्गत पातळीवरही अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने कठोर कारवाई करत देशभरातून या दोन मसाल्यांचे 1500 हून अधिक नमुने मागवले आहेत. हे नमुने चाचणीत अपयशी ठरले, तर या कंपन्यांच्या उत्पादनांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो, असे सरकारने म्हटले आहे.
