MCX Share Price: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचा शेअर भाव बुधवारी कामकाजादरम्यान ₹१०,२५० प्रति शेअर या आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. कंपनीनं २० नोव्हेंबर २०२५ रोजी नोंदवलेला आपला मागील उच्चांक ₹९,९७५ पार करून हा नवीन विक्रम स्थापित केला आहे. हा शेअर सलग तिसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत व्यवहार करत आहे. मागील एका महिन्यात MCX च्या शेअर्सनी बाजाराला मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे.
गेल्या एका महिन्यात MCX च्या शेअर्समध्ये १३% ची वाढ झाली आहे, तर याच काळात बीएसई सेन्सेक्स मध्ये केवळ ०.२६% ची वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, ११ मार्च २०२५ रोजी नोंदवलेल्या आपल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी ₹४,४१०.१० च्या तुलनेत हा शेअर १३०% नं उसळला आहे.
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
तांत्रिक समस्येचं निराकरण आणि आर्थिक परिणाम
तांत्रिक समस्या: २८ ऑक्टोबर रोजी एक्सचेंजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व्यापाराची सुरुवात उशिरा झाली होती. मात्र, कंपनीनं या समस्येचे कारण शोधून काढले आहे आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पाऊले उचलली आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, तिची ट्रेडिंग प्रणाली मजबूत आहे आणि बाजारातील वाढता व्यापार हाताळण्यास सक्षम आहे.
वित्तीय परिणाम : कंपनीनं आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत परिणाम सादर केले आहेत. या कालावधीत कंपनीचा एकूण नफा मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५१% वाढून ₹४००.६६ कोटी झाला. कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यूदेखील (Operating Revenue) ४४% वाढून ₹७४७.४४ कोटी झाले. यासोबतच, EBITDA मध्ये ५३% ची वाढ होऊन ते ₹५४४.४६ कोटींवर पोहोचले.
परंतु, मागील तिमाहीच्या (एप्रिल-जून) तुलनेत या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीचं उत्पन्न जवळपास स्थिर राहिलं आणि नफ्यात २.८२% ची किरकोळ घट नोंदवली गेली.
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रवीणा राय म्हणाल्या की, उत्पादनं आणि बाजारपेठेतील सहभागातील वाढ गुंतवणूकदारांचा MCX वरील विश्वास दर्शवतं. त्या उत्पादन श्रेणीचा विस्तार करण्यासाठी आणि बाजारातील पकड अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.
विश्लेषकांचं मत, ₹१२,५०० पर्यंत टार्गेट
शेअर बाजारातील विश्लेषकांनी MCX च्या शेअरवर विश्वास दाखवला आहे.
ॲक्सिस कॅपिटलनं अलीकडेच स्टॉकवर बाय रेटिंगसह कव्हरेज सुरू केले असून ₹१२,५०० चे प्राइस टारगेट दिलं आहे. बाजारात MCX साठी ॲक्सिस कॅपिटलचं हे प्राइस टारगेट सर्वाधिक आहे.
UBS ने देखील ऑक्टोबर २०२४ मध्ये रेटिंग बाय मध्ये अपग्रेड करत आपले लक्ष्य ₹१०,००० वरून वाढवून ₹१२,००० केलं होतं.
राय यांनी सांगितलं की, वाढीचे लक्ष्य १० पट आहे, परंतु ते एकाच वेळी साध्य होऊ शकत नाही आणि पहिला टप्पा पुढील १२-१८ महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे.
MCX वर एकूण ११ विश्लेषकांचे कव्हरेज आहे, त्यापैकी पाच जणांनी बाय रेटिंग, चार जणांनी होल्ड आणि दोघांनी सेल रेटिंग दिली आहे. सध्या MCX चे शेअर्स ३.४% वाढून ₹१०,२०३ वर व्यवहार करत आहेत, जे गेल्या एका महिन्यात ९.६४% ने वाढले आहेत.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
