MCX Share Price : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चे शेअर्स शुक्रवारी, २ जानेवारी रोजी त्यांच्या मागील बंद भावापेक्षा ८०% पडल्याचे दिसत आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे कोणतंही वास्तविक नुकसान नाही; प्रत्यक्षात हा शेअर सकारात्मक कल दाखवत व्यवहार करत आहे.
याचं मुख्य कारण म्हणजे MCX चे शेअर्स १:५ या प्रमाणात 'स्प्लिट' (Share Split) झाले आहे. २ जानेवारी ही या कॉर्पोरेट ॲक्शनची रेकॉर्ड डेट होती, ज्यामध्ये प्रत्येक विद्यमान शेअरचं पाच शेअर्समध्ये विभाजन करण्यात आलं आहे. यामुळे MCX च्या शेअरची किंमत आपोआप विभागणीपूर्वीच्या किमतीच्या पाचव्या भागापर्यंत अॅडजस्ट झाली आहे.
टेक्निकल अॅडजस्टमेंट मूळ कारण
या बदलामुळे, एनएसईवरील (NSE) काही चार्ट्समध्ये हा शेअर १०,९८९ रुपयांच्या मागील बंद भावावरून ८०% घसरलेला दिसत आहे, परंतु हे केवळ एक टेक्निकल अॅडजस्टमेंट आहे, वास्तविक नुकसान नाही. शेअर स्प्लिटनुसार किंमत समायोजित केल्यावर, गुरुवारचा (१ जानेवारी) MCX चा बंद भाव आता २,१९८ रुपये झालाय.
जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर्स विभाजित करते, तेव्हा शेअर्सची संख्या वाढते आणि प्रति शेअर किंमत कमी होते. यामुळे कंपनीचे एकूण गुंतवणूक मूल्य आणि मार्केट कॅप बदलत नाही.
प्रत्यक्षात कामगिरी मजबूत
बंद भावाचा विचार केला, तर MCX चे शेअर्स दिवसाच्या २,२७८ रुपयांच्या उच्चांकापर्यंत म्हणजेच ३.६ टक्क्यांनी वधारले होते. MCX ने १७ डिसेंबर रोजी आपल्या १:५ शेअर विभाजनासाठी शुक्रवार, २ जानेवारी ही रेकॉर्ड डेट जाहीर केली होती. याअंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला एक शेअर, २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या पाच शेअर्समध्ये विभागला गेला आहे.
मॉर्गन स्टॅनलेकडून रेटिंगमध्ये वाढ
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच जागतिक ब्रोकरेज फर्म 'मॉर्गन स्टॅन्ले'नं (Morgan Stanley) MCX च्या शेअर्सचे रेटिंग आणि टार्गेट प्राईज वाढवली आहे. CNBC TV-18 च्या रिपोर्टनुसार, जागतिक ब्रोकरेजने MCX च्या शेअर्सवर सकारात्मक बदल केला आहे, त्यानं त्याची टार्गेट प्राईज पूर्वीच्या ₹६,७१० वरून ₹११,१३५ पर्यंत वाढवली आहे आणि त्याचं रेटिंग 'इक्वल वेट' असं बदललं आहे.
रिपोर्टनुसार, MCX चं रेटिंग अपग्रेड करण्याचे कारण म्हणजे कमोडिटीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या सरासरी दैनंदिन व्यवहार महसुलात झालेली तीव्र वाढ. येत्या काही महिन्यांतही ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे FY26, FY27 आणि FY28 साठी प्रति शेअर कमाई अनुक्रमे १५%, २०% आणि २४% वाढेल.
दीर्घकालीन कामगिरी उत्कृष्ट
गेल्या एका वर्षात MCX च्या शेअर्समध्ये ७५% ची प्रचंड उसळी पाहायला मिळाली आहे, जी बेंचमार्क निर्देशांकाच्या वाढीपेक्षा कितीतरी जास्त आहे. पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीत हा शेअर ५३५% च्या शानदार वाढीसह 'मल्टीबॅगर स्टॉक' म्हणून समोर आला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
