लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोरोना महामारी ओसरली असली तरी कोविडकाळातील ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या आठवणी सर्वांच्या मनात कायम आहेत. अशात चीनमध्ये निर्माण झालेल्या एचएमपी व्हायरसचे तीन रुग्ण भारतात सापडल्याने चिंता वाढली आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार १,२५८ अंकांनी घसरला आहे. त्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी विक्रीचा मारा सुरुच ठेवल्याने घसरणीत भर पडली.
बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य सोमवारी घटून ४३९.०३ लाख कोटींवर आले. शुक्रवारी हे मूल्य ४४९.७८ लाख कोटी इतके होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात १०.८३ लाख कोटींची घट झाली आहे.बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य सोमवारी घटून ४३९.०३ लाख कोटींवर आले. शुक्रवारी हे मूल्य ४४९.७८ लाख कोटी इतके होते.
कोणत्या शेअर्सना फटका?
- सेन्सेक्समधील टाटा स्टील, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, झोमॅटो, अदाणी पोर्ट्स, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक नुकसानात राहिले.
- फक्त टायटन आणि सन फार्मा हे दोन समभाग फायदेशीर ठरले. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी वाढीसह बंद झाला, तर जपानचा निक्केई, चीनचा
- शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंगमध्ये घसरण दिसून आली. युरोपातील प्रमुख बाजार संमिश्र प्रवाहात राहिले, तर अमेरिकन बाजार शुक्रवारी वाढीवर होते.
सेन्सेक्स घसरला १,२५८ अंकांनी
- गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात १०.८३ लाख कोटींची घट झाली आहे.
- सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स १,२५८ अंकांनी घसरून ७७,९६४ अंकांवर बंद झाला तर निफ्टीही ३८८ अंकांनी घसरून २३,६१६ अंकांवर स्थिरावला आहे.
- व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन एचएमपी व्हायरसची चिंता, रुपयाच्या विनिमय दरातील घट आणि आशियातील इतर बाजारांतील घसरण यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
घसरणीमागे कारणे काय?
- चीनमध्ये पसरलेल्या कोरोना सारख्या व्हायरसचा भारतात दुसरा रुग्ण सापडला. हा व्हायरस खोकताना आणि शिंकताना पसरतो. हा व्हायरसच्या भारतभर पसरल्याची भीती निर्माण झाली आहे.
- विदेशी गुंतवणूकदार संस्था सतत विक्री करत आहेत. जानेवारी महिन्यात आतापर्यंत ४,२८५ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. केवळ ३ जानेवारी रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी ४,२२७ कोटींचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८२० कोटींचे शेअर्स खरेदी केले आहेत.
- याच आठवड्यात सुमारे ३६ कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. यात टीसीएस, डीमार्ट, मोबिक्विक आणि आयआरईडीए आदी कंपन्या आहेत. त्यामुळेही गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
५ हजार रुपयांपर्यंंत सोने होणार महाग?
गेल्या अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेले सोन्यावरील सीमा शुल्क पुन्हा वाढवून पूर्ववत करण्याचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत ४ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. जुलै २०२४मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने व चांदी यांच्या लडींवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून कमी करून ६ टक्के केले होते. देशांतर्गत मूल्यवर्धन करून रत्ने व दागिन्यांची निर्यात वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा उद्देश साध्य झाला नाही. २०२४मध्ये सोन्याची आयात १०४ टक्के वाढून १०.०६ अब्ज डॉलरवर पोहोचली. तथापि, रत्ने व दागिन्यांची निर्यात २३ टक्के घटून १.९९ अब्ज डॉलर झाली होती.