Stock Market : भारतीय शेअर बाजाराने आज 'पिक्चर अभी बाकी है' याचा प्रत्यय गुंतवणूकदारांना दिला. सत्राच्या सुरुवातीला घसरणीच्या गर्तेत असलेला बाजार शेवटच्या एका तासात अक्षरशः फिनिक्स पक्षासारखा झेपावला. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक निफ्टी या तिन्ही प्रमुख निर्देशांकांनी खालच्या स्तरावरून १ टक्क्यांहून अधिक सुधारणा नोंदवली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल १५ दिवसांनंतर केलेल्या खरेदीमुळे आणि मेटल शेअर्समधील ऐतिहासिक तेजीमुळे बाजाराने हिरव्या निशाणीत क्लोजिंग दिली.
शेवटच्या तासातील 'गेम चेंजर' फॅक्टर्स
विदेशी गुंतवणूकदारांची घरवापसी : १५ सत्रांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी रोख बाजारात ४८० कोटींची खरेदी केली.
देशांतर्गत गुंतवणुकीचा भक्कम पाठिंबा : देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३,३६० कोटींची मोठी गुंतवणूक करून बाजाराला सावरले.
मेटल क्षेत्राचा धडाका : जागतिक बाजारपेठेत तांब्याच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने 'निफ्टी मेटल इंडेक्स' १.९% वाढून ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.
मेटल क्षेत्रात हिंदुस्तान कॉपरने १७% उडी घेत सर्वांचे लक्ष वेधले. नॅल्को (३%), हिंदाल्को (१.८%) आणि हिंदुस्तान झिंक (१%) या शेअर्सनीही तेजीला साथ दिली.
तज्ज्ञांचे काय आहे मत?
(कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले, "निफ्टी २५,२०० च्या वर टिकला तर ही रॅली २५,५०० ते २५,५७५ पर्यंत जाऊ शकते. मात्र, २५,१५० चा स्तर तुटल्यास बाजार पुन्हा २४,९०० पर्यंत घसरण्याची भीती आहे. गुंतवणूकदारांनी २५,३००-२५,२५० च्या दरम्यान खरेदी करावी, पण २५,१५० चा कडक 'स्टॉप लॉस' लावावा."
जिओजित इन्व्हेस्टमेंट व्ही. के. विजयकुमार यांच्या मते "बाजार कधीही धक्का देऊ शकतो. जर भारत-अमेरिका व्यापार कराराची सकारात्मक बातमी आली, तर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये कंपन्यांच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते आणि बाजारात मोठी रॅली येईल."
वाचा - गुंतवणूकदारांची चांदी! सरकारी कंपनीचा शेअर सुसाट; दोन महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे 'डबल'
सावधान! अस्थिरता अजून संपलेली नाही
बाजाराने रिकव्हरी दाखवली असली तरी 'इंडिया VIX' अजूनही १२ च्या वर आहे. याचा अर्थ नजीकच्या काळात मोठी चढ-उतार कायम राहू शकते. तांत्रिकदृष्ट्या जोपर्यंत निफ्टी २५,५०० च्या वर स्थिरावत नाही, तोपर्यंत याला केवळ 'पुलबॅक रॅली' मानले जावे.
