Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज (बुधवार, १० डिसेंबर) सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. बाजाराने सकाळच्या सत्रात उत्साहात सुरुवात केल्याने काही वेळ बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होता. पण, दुपारनंतर गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री सुरू केल्याने बाजार लाल निशाणीवर बंद झाला. गुंतवणूकदारांचे लक्ष आता थेट अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालांवर लागले आहे.
गुंतवणूकदारांचे १.०९ लाख कोटी रुपये बुडाले
या सलग तिसऱ्या दिवसाच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज ४६३.८२ लाख कोटी रुपयांवर आले, जे आदल्या दिवशी ४६४.९१ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एकाच दिवसात सुमारे १.०९ लाख कोटींची घट झाली.
घसरणीची कारणे
फेडरल रिझर्व्हची प्रतीक्षा : आज रात्री उशिरा फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निर्णयांचा रुपया आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या ओघावर थेट परिणाम होणार असल्याने, गुंतवणूकदार कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हते.
क्षेत्रीय पडझड : ब्रॉडर मार्केटमध्ये ही घसरण अधिक तीव्र होती. मिड-कॅप इंडेक्समध्ये १% तर स्मॉल-कॅप इंडेक्समध्ये ०.५८% ची घसरण झाली. आयटी, टेलिकॉम, फायनान्शियल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री झाली.
तेजीमध्ये असलेले शेअर्स
सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ शेअर्समध्ये हिरवी निशाणी राखली. यात सर्वाधिक १ टक्के इतकी वाढ टाटा स्टीलमध्ये झाली. तर सन फार्मा, आयटीसी, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने ०.४३% ते ०.७५% पर्यंत वाढ नोंदवली. मेटल आणि एनर्जी शेअर्समध्ये तेजी दिसून आली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.
घसरण झालेले शेअर्स
सेन्सेक्समधील १९ शेअर्स घसरणीसह बंद झाले. यात इटरनलचे २.८६% घसरणीसह सर्वाधिक नुकसान झाले. तर ट्रेंट, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्ये ०.८४% ते १.६६% पर्यंत घसरण झाली.
आजच्या बाजाराची एकूण आकडेवारी
बीएसईवर आज एकूण ४,३३७ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,२८९ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर १,८९९ शेअर्समध्ये तेजी दिसली. याचबरोबर ७४ शेअर्सनी आपला नवीन ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १३६ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला.
