नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने जानेवारी २०२६ पासून २४ तास आणि ४८ तासांत हमी-आधारित मेल व पार्सल पोहोच करणारी नवी वितरण सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
शिंदे यांनी सांगितले की, “आम्ही अशा नव्या टपाल सेवांचा शुभारंभ करणार आहोत ज्यामध्ये निश्चित वेळेत वितरणाची हमी दिली जाईल. ‘२४ तास स्पीड पोस्ट’ अंतर्गत मेल २४ तासांत पोहोचेल, तर ‘४८ तास स्पीड पोस्ट’ द्वारे मेल ४८ तासांत वितरित होईल. या सेवा जानेवारी २०२६ पासून देशभर सुरू केल्या जातील.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, सध्या ३ ते ५ दिवस लागणाऱ्या पार्सल वितरणासाठी आता दुसऱ्याच दिवशी (नेक्स्ट-डे) वितरणाची नवी सेवा सुरू होईल. भारतीय टपाल विभागास २०२९ पर्यंत ‘नफ्याचे केंद्र’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नव्या सेवा आणण्यात आल्या आहेत. या नव्या सेवांमुळे देशातील टपाल सेवा अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.