Car Accident Insurance Claim : नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर काय करायचं? नुकसान कोण भरपाई देईल आणि विमा क्लेम कसा होईल? असाच एक महत्त्वाचा प्रश्न अलीकडेच दिल्लीतील निर्माण विहारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे समोर आला आहे. येथील एका शोरूममधून नवीन महिंद्रा थारची डिलिव्हरी घेताना ती पहिल्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेच्या निमित्ताने आपण अशा परिस्थितीत कोण जबाबदार असतो आणि विमा नियमांनुसार नुकसान भरपाई कशी मिळते, हे सविस्तर जाणून घेऊया.
नवीन गाडीचा विमा आधीच सुरू होतो
तुम्ही जेव्हा एखादे नवीन वाहन खरेदी करता, तेव्हा त्याची डिलिव्हरी देण्याआधीच त्याची विमा पॉलिसी सुरू केली जाते. याचा अर्थ, गाडी शोरूममधून बाहेर येण्याआधीच ती पूर्णपणे विम्याद्वारे सुरक्षित असते. त्यामुळे, डिलिव्हरीच्या वेळी किंवा शोरूममधून बाहेर पडताच अपघात झाला, तर त्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीच करते.
निर्माण विहारमधील घटनेमध्ये, ग्राहक महिलेने पूजा करत असताना उत्साहाच्या भरात चुकून एक्सीलरेटर दाबला, ज्यामुळे गाडी पहिल्या मजल्यावरील काच तोडून खाली रस्त्यावर पडली. सुदैवाने, एअरबॅग उघडल्यामुळे कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडी आणि बाजूला उभ्या असलेल्या मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले.
जबाबदारी कोणाची असते?
नियमांनुसार, जेव्हा वाहनाची डिलिव्हरी पूर्ण होते, म्हणजे वाहनाची नोंदणी ग्राहकाच्या नावावर होते, विमा पॉलिसीची कागदपत्रे दिली जातात आणि गाडीची चावी ग्राहकाच्या हातात येते, तेव्हा त्या गाडीचा मालकी हक्क आणि जबाबदारी ग्राहकाची होते. त्यामुळे, जर वाहन चालवताना अपघात झाला तर ग्राहकच विमा क्लेम दाखल करू शकतो. जर विमा पॉलिसी आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर मात्र जबाबदारी शोरूम किंवा वाहन विक्रेत्याची असू शकते.
विमा क्लेम कसा मिळवायचा?
नवीन गाडीचा विमा बहुतांशवेळा डिलिव्हरीच्या आधीच शोरूमकडून केला जातो. त्यामुळे अपघातानंतर झालेल्या नुकसानीसाठी ग्राहक विमा क्लेम मिळवू शकतो. यासाठी, खालील प्रक्रिया पाळणे महत्त्वाचे आहे:
- विमा कंपनीला ताबडतोब कळवा: अपघातानंतर लगेचच तुमच्या विमा कंपनीला याची माहिती द्या.
- पुरावे गोळा करा: घटनेची छायाचित्रे काढा आणि पोलिसांना कळवून आवश्यक असल्यास पोलीस रिपोर्ट तयार करा.
- सर्वेअरची मदत घ्या: विमा कंपनी नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी एक सर्व्हेअर पाठवते. तो नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल देतो.
- कागदपत्रे जमा करा: सर्व्हेअरकडे गाडीचे रजिस्ट्रेशन पेपर्स, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करा.
वाचा - एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
ही प्रक्रिया योग्यप्रकारे पाळल्यास तुमचा क्लेम सहज मंजूर होऊ शकतो आणि तुम्हाला नुकसानीची भरपाई मिळेल. ही घटना प्रत्येक नवीन वाहन खरेदी करणाऱ्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे की गाडीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी विमा पॉलिसीची माहिती घेणे किती गरजेचे आहे.